संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे आक्रमक, मोदी सरकारला विचारला जाब

संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे आक्रमक, मोदी सरकारला विचारला जाब

संसदेत दररोज फक्त 4 तास कामकाज होणार आहे. जवळपास सर्वच कामकाज डिजिटल पद्धतीने होणार असून प्रश्नांची उत्तरही Online पद्धतीनेच दिली जाणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 14 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या संसदेत कायम सक्रिय असतात. देशात कोरोनाचं संकट असतांना सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू झालं. त्यात पहिल्याच दिवशी खासदार सुळे यांनी शुन्यप्रहरात देशाच्या आर्थिक परिस्थितीवर आक्रमकपणे सरकारला प्रश्न विचारला. देश सध्या आर्थिक संकटात आहे. तरूणांना रोजगार नाही त्यामुळे तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे. मात्र तसं होतांना दिसत नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

लॉकडाऊनमुळे सगळा देश अडीच तीन महिने बंद होता. त्यामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला. कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा फटका बसला. यामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतु असं होताना दिसत नाही असंही सुळे यांनी म्हटलं आहे.

यावेळी प्रश्नोत्तराचा तास कमी करून तो फक्त अर्धातासच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कमी वेळात प्रश्न मांडून त्याचं उत्तर सरकारकडून मिळवण्याचं आव्हान सर्वच पक्षांच्या खासदारांपुढे आहे.

संसदेच्या अधिवेशन सोमवारपासून (14 सप्टेंबर) सुरू झालं. त्या पार्श्वभूमीवर संसदेत प्रवेश करणाऱ्या सगळ्यांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत अनेक खासदार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना आता क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी होणार आहे.

कोरोना उद्रेकानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनात सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. खासदारांच्या आसन व्यवस्थेपासून ते कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टी बदलली आहे. अनेक खासदारांच्या चाचणीचे रिझल्ट अजुन मिळालेले नाही अशी नाराजी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी व्यक्त केली आहे.

संसदेत दररोज फक्त 4 तास कामकाज होणार आहे. जवळपास सर्वच कामकाज डिजिटल पद्धतीने होणार असून प्रश्नांची उत्तरही Online पद्धतीनेच दिली जाणार आहेत. संसंद भवनाचा परिसर सॅनिटाइज करण्यात आला असून खासदारांनी काय काळजी घ्यावी याची नियमावली देण्यात आली आहे.

दोनही सभागृहांचं आतूनही सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी यावेळी पहिल्यांदाच नागरीकांना प्रवेश देण्यात येणार नाही.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 14, 2020, 3:08 PM IST

ताज्या बातम्या