पुडुकोट्टाई, 18 नोव्हेंबर : शाळेत झालेली मैत्री ही तरुणपणातील मैत्रीपेक्षा कितीतरी पटीने घट्ट असते. त्यामुळे शालेय जीवनातील मैत्री ही कधीही न तुटणारी असते, असं म्हणतात. मित्रांसाठी काहीही करायला तयार असणारे या जगात नेहमीच सापडतात. अशा प्रकारची अनेक उदाहरणे तुम्हाला अनेकवेळा पाहायला मिळतील. तामीळनाडूमधील पुडुकोट्टाई मध्ये देखील असेच उदाहरण समोर आले आहे. या मित्रांनी आपल्या मित्राला कधीही न विसरण्यासारखी दिवाळी भेट दिली आहे.
44 वर्षीय ट्रक ड्रायव्हर मुथुकुमार हा मागील काही काळापासून आर्थिक विवंचनेत होता. कोरोना (Corona Virus) काळात सर्व बंद असल्याने (Lockdown) त्याला याचा मोठा फटका बसला. या संदर्भातील वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालं आहे. कोरोनाच्या काळात मुथुची मासिक 15 हजार रुपयांची कमाई 2 हजार रुपयांवर आली आहे, त्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात आलेल्या गाझा वादळाचा त्याच्या घराला देखील मोठा फटका बसला होता. त्यामुळे घर मोडकळीस आलं होतं. याचा फटका त्याच्या कुटुंबियांना बसत होता.
मुथुकुमारचा मित्र नागेंद्रन काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाच्या घरी रियुनियन दरम्यान त्याला भेटला होता. त्यावेळी मुथुकुमारने त्याला घरी येण्याचं निमंत्रण दिलं. काही दिवसांनी नागेंद्रन मुथुकुमारच्या घरी गेला असता त्याचे घर पाहून त्याला धक्का बसला. आपल्या मित्राच्या घराची अवस्था पाहून त्याला वाईट वाटलं. घराच्या आजूबाजूच्या झाडांचं आणि घराच्या छताचं वादळामुळे मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी त्याने आपल्या मित्रासाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी प्रयत्न सुरु केले.
नागेंद्रन यांनी सोशल मीडियाची मदत घेत एक अनोखी कल्पना समोर आणली. यामध्ये त्यांनी एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यामध्ये शाळेतील अनेक मित्रांना ऍड केलं. त्याने कोणत्या कारणासाठी आपण पैसे गोळा करत आहोत हेदेखील सांगितलं. मुथुकुमार आणि त्याच्या कुटुंबासाठी अवघ्या 3 महिन्यांत नवीन घर बांधण्यासाठी मित्रांनी एकूण 1.5 लाख रुपये जमा केले. त्यानंतर मित्रांनी दिवाळी भेट म्हणून मुथुकुमारला घर गिफ्ट दिलं. दरम्यान, या गोष्टीविषयी बोलताना नागेंद्रन यांनी सांगितलं, आपल्या मित्राला संकटात बघून मला वाईट वाटलं. आम्ही आता संपर्कात नसलो तरीही शाळेपासूनची आमची पक्की मैत्री होती. त्यामुळे त्याला संकटात बघून आणि कोरोना काळात आर्थिक परिस्थिती खराब झाल्याने मी मदत करण्याचा निर्णय घेतला.