आज रात्री 12 वाजल्यापासून 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन

आज रात्री 12 वाजल्यापासून 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन

'कोरोनाव्हायर फैलावाचं चक्र मोडायलाच हवं. घरातली लक्ष्मणरेषा ओलांडून नका. जान है तो जहाँ है.'

  • Share this:

नवी दिल्ली 24 मार्च :  देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातल्या रुग्णांचा आकडा आज 519वर पोहोचला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित केलं. या आधी गुरूवारी त्यांनी भाषण केलं होतं. त्यात त्यांनी देशवासियांना रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभर जनतेने कडकडीत बंद पाळला होता. तर 5 वाजता आपल्या गॅलरीत येत सगळ्यांनी थाळीनाद करत डॉक्टर्स आणि कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सगळ्यांचे आभारही मानले होते. रात्री 12 पासून सर्व देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पुढचे 21 दिवस कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही अशी घोषणाही त्यांनी केली.

तुमचं घराबाहेर पडणं हे मृत्यूला आमंत्रित करणारं ठरेल. जगभरात हेच दिसून आलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर निघू नका असं तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मी सांगतो आहे असंही ते म्हणाले. ज्या देशांनी अशा प्रकारचे उपाय योजले त्यांना थोडा फार दिलासा मिळाला आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

पंतप्रधान म्हणाले, 22 मार्चला देशवासियांनी  जनता कर्फ्यूमध्ये आपलं योगदान दिलं. संकटाच्या या काळात सर्व एकत्र आले आणि जगाला दाखवून दिलं. मानवता आणि देशावर संकट आलं तर आम्ही सर्व भारतीय एकत्र येवून त्याचा सामना करतो हे जगाला दाखवून दिलं आहे. जगातल्या शक्तिशाली देशांनाही कोरोनाने गुडघे टेकायला लावलं आहे. या देशांजवळ सर्व साधनं असतानांही कोरोना वेगाने पसरत आहे.

कोरोनाशी लढायचं असेल तर सोशल डिस्टसिंगशिवाय कुठलाही पर्याय नाही असं जगातले तज्ज्ञ सांगत आहेत. घरातच राहिल्याशिवाय कोरोनाचा प्रसार थांबत नाही. घरात थांबणं हे फक्त रुग्णच नाही तर प्रत्येकासाठी गरजेचं आहे. तुमची एक चूक तुमच्या कुटुंबाला आणि देशालाही अडचणीत टाकू शकते.

असंच दुर्लक्ष होत राहिलं तर भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागले. त्याचा अंदाज करणंही शक्य नाही. सगळ्यांनी सरकारच्या सूचनांचं पालन करा असं आवाहनही त्यांनी केलं.

देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातल्या रुग्णांचा आकडा आज 519वर पोहोचला अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक 107 तर केरळमध्ये 87 जणांचा समावेश आहे. सख्या वाढत असल्याने जवळपास सरर्वच राज्यांनी लॉकडाउन केलं असून अनेक राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

लॉकडाऊनला गांभीर्यानं घ्या

नरेंद्र मोदींनी कठोर शब्दात काळ ट्विटरवर जनतेला आवाहन केलं होतं. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचे आदेश देऊनही अनेक जण बाहेर फिरताना दिसत आहेत. काही जण कामाविना फिरताना आढळून आले आहेत. लॉकडाऊनला अजूनही गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र जनतेनं हे गांभीर्यानं घ्यायला हवं. सरकारननं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. राज्य सरकारनं आपल्या स्तरावर नियमांचं कठोरपणे पालन करण्याचे आदेशही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत.

राज्यात १८ नवीन करोना बाधित रुग्ण

राज्यात काल रात्रीपासून कोरोनाच्या 18 नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०७ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे 6, सांगली मधील इस्लामपूरचे 4, पुण्याचे 3, सातारा जिल्ह्यातील 2 तर अहमदनगर, कल्याण - डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे 8 रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आहेत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

 

First published: March 24, 2020, 8:09 PM IST

ताज्या बातम्या