कानपूर, 15 मे : कानपूरमध्ये बिठूर परिसरात एक अपार्टमेंटच्या 8 व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळं एका डॉक्टर महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. महिलेच्या वडिलांनी 40 लाखांचे लोन फेडले नाही म्हणून जावयाने तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. मृत डॉ. मंजू वर्मा या उरई मेडिकल कॉलेजमधील असिस्टंट प्रोफेसर डॉ. सुशील वर्मा यांच्या पत्नी होत्या.
डॉ. सुशील वर्मा आणि त्यांच्या पत्नी मंजू वर्मा हे बिठूर सिंहपूर रोडवरील रुद्रा ग्रीन अपार्टमेंटमध्ये राहतात. याठिकाणी आठव्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. शुक्रवारी रात्री अपार्टमेंटच्या 8 व्या मजल्यावरील या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू डॉ. मंजू वर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या वडिलांनी जावयावर गंभीर आरोप केले आहेत.
(वाचा-आईच्या उपचारासाठी Plasma हवा होता, तरुणाला ऑनलाइन प्रतिसादही मिळाला पण...)
या प्रकरणाबाबत माहिती मिळताच डॉ. मंजू यांचे वडील अर्जुन प्रसाद कानपूरला पोहोचले. आपल्या मुलीनं आत्महत्या केली नाही, किंवा हा अपघात नसून जावयाने 8 व्या मजल्यावरून खाली फेकून तिची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अर्जुन प्रसाद यांनी आरोप करताना म्हटले की, त्यांचे जावई डॉ. सुशील हे नेहमी पत्नीला हुंड्यासाठी मारहाण करत होते. वारंवार मागून त्यांना पैसे दिले नाही तर त्यांनी मुलीच्या नावावर बँकेतून 40 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर या कर्जाची फेड डॉ. मंजू यांच्या माहेरच्यांनी करावी अशी धमकी त्यांनी दिल्याचं अर्जु प्रसाद यांनी सांगितलं. याला विरोध केल्यामुळं मुलीची 8 व्या मजल्यावरून खाली फेकून हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
(वाचा - Yavatmal News : प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या, एकटी असताना धारदार शस्त्राने वार)
या आरोपांनंतर पोलिसांनी महिलेचा पती असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर सुशील वर्माला ताब्यात घेतलं आहे. त्यांची कठोर चौकशी करून खरं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. डॉ. मंजू यांचा विवाह डॉ. सुशील यांच्याबरोबर जानेवारी 2019 मध्ये झाला होता. लग्नानंतर डॉ. सुशील अनेकदा पत्नीला मारहाण करत होते. हुंड्याच्या मागणीसाठी त्यांनी अनेकदा पत्नीला मारहाण केली. या मुद्द्यावर दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक वाद आले. अनेकदा यावर चर्चा झाली. पण मुलीच्या संसारासाठी तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली नाही, असे सांगितले जात आहे. भास्करनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाहून पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर ही हत्या आहे, अपघात आहे की आत्महत्या हे स्पष्ट होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. पण अशा उच्चशिक्षित कुटुंबात घटना घडल्यानंतर हुंड्यासारखे आरोप होणं ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. महिलांनी स्वतः वेळीच याविरोधात उभं राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.