अहमदाबाद, 19 एप्रिल : आपल्या आजारी मुलाला जपानमधून (Japan) भारतात (India) आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका वृद्ध पित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah)यांना पत्र लिहून मदतीची याचना केली आहे.
हरीभाई पटेल(Haribhai Patel)असं या पित्याचं नाव असून,त्यांचा मुलगा जयेश पटेल(Jayesh Patel)जपानमधील एका रुग्णालयात दाखल आहे.तिथला खर्च परवडत नसल्यानं जयेश याला भारतात परत आणण्याची हरिभाई यांची इच्छा आहे. मात्र यासाठीही तब्बल सव्वा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्यानं, हतबल झालेल्या या पित्यानं थेट पंतप्रधान, गृहमंत्री यांना मदतीचं साकडं घातलं आहे. त्यांनी खासदार हसमुख पटेल यांनाही पत्र लिहून मदतीचं आवाहन केलं आहे. हसमुख पटेल यांनी जपानमधील भारतीय दूतावासाला पत्र लिहून एअर इंडियाच्या विमानाद्वारे जयेश पटेल याला भारतात आणण्याची सोय करण्याबाबत सूचना दिली आहे. यामुळे हरीभाई यांना दिलासा मिळाला असून,ते आता आपल्या मुलाला घेऊन भारतात परतण्याची वाट पाहत आहेत.
हे ही वाचा-BREAKING : माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही Covid-19 पॉझिटिव्ह; AIIMS मध्ये दाखल
गुजरातमधील अहमदाबाद (Ahmadabad)शहरातील घाटलोडिया भागात शायना सिटी इथं राहणारे हरीभाई पटेल हे निवृत्त शिक्षक असून,सध्या ते मुलाच्या देखभालीसाठी अल्पकालीन व्हिसावर जपानमध्ये राहत आहेत. त्यांचा मुलगा जयेश पटेल हा गेली अडीच वर्षे जपानमध्ये काम करत आहे. त्याला क्षय रोग(TB)झाल्यानं 5 ऑक्टोबर 2020 मध्ये शिबुकावा मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. त्यातून तो बरा होत असतानाच 7 जानेवारी रोजी त्याला ब्रेन स्ट्रोक(Brain Stroke)आला आणि त्याची तब्ब्येत खूपच खालावली. त्याच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र इथल्या उपचारांचा खर्च अत्यंत महाग असल्यानं मध्यमवर्गीय हरीभाई यांना तो परवडणे अशक्य आहे. त्यामुळं आपल्या मुलाला भारतात परत नेऊन तिथं त्याच्यावर उपचार केले जावेत अशी त्यांची धडपड आहे. जयेशला पत्नी आणि दोन मुली असून,ते सर्वजण भारतात हरीभाई यांच्यासमवेत राहतात. जयेशची पत्नी जलपा हिनं सहा महिन्यांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला आहे. अशा परिस्थितीत एकट्यानं परदेशात आपल्या मुलाची देखभाल करणं हरीभाई यांना खूप कठीण जात आहे.
‘आपल्या मुलाची संपूर्ण जबाबदारी घेण्यास आपण तयार असून,त्याला परत भारतात नेण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी मदत करावी’,असं हरीभाई यांनी म्हटलं आहे. माझा मुलगा क्षयरोगातून 80 टक्के बरा झाला होता पण आता तो मेंदूपर्यंत पसरल्यानं त्याची तब्ब्येत खूपच खराब झाली आहे,असंही हरीभाई यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Japan, Modi government