हैदराबाद 17 ऑगस्ट: कोरोनामुळे सगळ्यांचं आयुष्यच बदलून गेलं आहे. जगण्याची दिशाच बदलल्याने त्याचे पडसाद समाजात दिसत आहेत. कोरोनामुळे अनेक माणसं जवळ आलीत. तर अनेक जण आपल्याच माणसांपासून दूर गेलीत. ह्रदयाला पाझर फोडणाऱ्या अनेक घटना सध्या पुढे येत आहेत. तेलंगणात अशाच एका घटनेने सगळ्यांनाच सुन्न करून सोडलं. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तिवर त्याच्या मुलांनीच अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. शेवटी एका स्वयंसेवी संघटनेनं पुढाकार घेत सगळे विधी पूर्ण केलेत.
कोरोनामुळे नाकारलेल्या अशा उपेक्षित लोकांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम Youth Welfare Telangana ही संस्था करत आहे. सय्यद जलालुद्दीन जफर हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अशा 147 लोकांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांनी अशा मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना सांगितल्या आहेत. ते म्हणाले, माझ्याच एका मित्राचे वडिल कोरोनामुळे गेले. पण त्या मित्राने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. शेवटी आमच्या संघटनेने पुढाकार घेऊन सगळे शेवटचे संस्कार पूर्ण केले.
जात, धर्म, पंथ, अशा कुठल्याही गोष्टी न पाहता आम्ही हे काम करत असंही जफर यांनी सांगितलं आहे. जीव धोक्यात घालून असं काम करणाऱ्या या संगटनेचं आज सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
A friend's father died due to COVID19 & he refused to perform the last rites. We felt it was our duty to help in the interest of humanity. We have dealt with 147 such bodies till now: Syed Jalaluddin Zafar, President, Youth Welfare Telangana. https://t.co/It9R2eGaRH pic.twitter.com/TrVJ0OlgG5
— ANI (@ANI) August 17, 2020
अशा अनेक घटनांमुळे समाजातली माणूसकी हरवली आहे की काय असा सवालही जफर यांनी केला आहे. अशा घटनांमध्ये जास्त शिकलेलेच लोक आहेत. कोरोनाची सगळी माहिती आता बाहेर आली आहे. काय काळजी घ्यावी याचीही माहिती आहे. असं सगळं असतांनाची काल्पनिक भीतीने रक्ताचं नातं नाकारणाऱ्या मुलांना काय म्हणावं असा सवालही त्यांनी केलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus