शेतकऱ्यांचे 'बुरे दिन'! खतांच्या दरवाढीमुळे मोडले कंबरडे

शेतकऱ्यांचे 'बुरे दिन'! खतांच्या दरवाढीमुळे मोडले कंबरडे

मागच्या ३ महिन्यात खतांच्या किमतीत तब्बल १५ ते २० टक्के एवढी दरवाढ झाल्यामुळे, रब्बीची तयारी कशी करायची असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.

  • Share this:

3 ऑक्टोबर - एकीकडे सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त झाला आहे. त्यातच आता शेतकरी वर्गापुढेहि या महागाईने मोठी अडचण निर्माण केलीय. मागच्या ३ महिन्यात खतांच्या किमतीत तब्बल १५ ते २० टक्के एवढी दरवाढ झाल्यामुळे, अगोदरच दुष्काळाला तोंड देत असताना रब्बीची तयारी कशी करायची असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीत शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून त्यांना रोखण्यात आलं. एकीकडे सरकार शेतीला प्राधान देत असली तरी, पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे खतांच्या दरांवर अंकुश ठेवण्यास सरकार अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे.

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली सोडले तर सर्वच जिल्ह्यात तब्बल २० टक्क्यांपेक्षा कमी-अधीक पाऊस झालाय. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झालाय. शिवाय येणाऱ्या रब्बी हंगामासाठी पाणी नसल्यामुळे मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसतोय. त्यातच ज्या पद्धतीने पेट्रोल, डिझेलच्या किमती रोजच वाढताहेत त्याच प्रमाणे दुसरीकडे शेतकऱ्यांना लागणाऱ्या महत्वाच्या खतांच्या दरांनी मागच्या ३ महिन्यात मोठा उच्चांक गाठलाय.

गेल्या तीन महिन्यात डीएपी १२ टक्के, १०:२६:२६ - १६ टक्के, १२:३२:१६ - १५ टक्के, २०:२०:०:१३ - १४ टक्के वाढ झालीय. त्यामुळे हि खतं आता कशी खरेदी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याने हे भाव वाढत चाललेत, शिवाय वाढत्या दरामुळे या खतांच्या खरेदीत गतवर्षी पासून १० ते २० टक्क्यांपर्यंत फरक पडला असल्याचं खत व्यापारी केदारशेठ सारडा यांनी न्यूज18 लोकमतला सांगितलं.

तीन महिन्यातील वाढलेले खतांचे दर...

खत      जुलै     ऑगस्ट      सप्टेंबर

डीएपी            १२५०    १३४०       १४००

१०:२६:२६        ११६०     १२८०       १३४०

१२:३२:१६         ११७५     १२९०       १३५०

२०:२०:०:१३      ९३०      १०१५       १०४०

खरिपाच्या हंगामात मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत पाऊस कमी पडल्यामुळे जवळपास सर्वच पिकांवर त्याचा विपरित परिणाम झालाय. त्यातच शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावा प्रमाणे मुग, उडीद, सोयाबीन यांची अद्यापही खरेदी सुरु न झाल्याने खाजगीत व्यापारी कमी भावाने मालाची खरेदी करताहेत. याच पार्श्वभूमीवर शेतीतील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलेला असताना, शेतकऱ्यांना मिळणारा नफा या दोन्हीत मोठी तफावत येत आहेत त्यातच हि खतांची सुरु असलेली दरवाढ शेती उध्वस्त करायला लावणारी असल्याची प्रतिक्रिया शेतकरी दीपक लिपणे, गणेश कोल्हे आणि माणिक कदम यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

तर, गांधी जयंतीच्या निमित्तानं काल उत्तर भारतातले हजारो शेतकरी दिल्लीवर धडकले होते. पण दिल्लीच्या वेशीवर त्यांच्यावर पाण्याचे फवारे सोडण्यात आले. यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेला छावणीचं स्वरुप आल्याचं काल पहायला मिळलं. अनेक भागांत संचारबंदीही लागू करण्यात आली होती. शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा अशापद्धतीने काल रोखण्यात आलं.

सरकार एकीकडे शेतीला प्रथम प्राधान देत असली तरी, दुसरीकडे पेट्र्ोल आणि डिझेल प्रमाणे वाढत असलेल्य़ा खतांच्या दरांवर अंकुश ठेवण्यास सरकार सपशेल अपयशी ठरलंय. यामुळे त्यात सर्वसामान्य शेतकरीच भरडल्या जात असल्याचं दिसून येत आहे. एकूणच पाऊस नाही. पिकांचे होणारे नुकसान, वाढलेला उत्पादन खर्च, त्या मानाने कमी झालेले उत्पन्न याच दरम्यान वाढत जाणाऱ्या शेती निविष्ठांच्या किमती निश्चितच शेतकऱयांचे आर्थिक कंबरडे मोडणाऱ्या आहेत असे म्हणावे लागेल.

 VIDEO : नवनीत राणांचा धम्माल दांडिया डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2018 05:51 PM IST

ताज्या बातम्या