नवी दिल्ली 13 डिसेंबर: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधल्या (Punjab) शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन (Farmer agitation) चिघळलं आहे. आंदोलकांनी आपला मोर्चा आता दुसऱ्या ठिकाणांवर केंद्रीत केला असून राजस्थानातल्या शाहजहांपूर इथं हरियाणा सीमेजवळ शेतकऱ्यांनी हायवे बंद केला आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांनी वाहतूक वळवली आहे. कृषी कायदे रद्द करा ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी असून सरकार त्यासाठी तयार नाही. परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
गेल्या 18 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून सरकार आणि आंदोलक संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही. सरकार नव्या कायद्यांमध्ये दुरूस्त्या करण्यास तयार आहे. मात्र आंदोलक त्यासाठी तयार नाहीत त्यामुळे आंदोलन चिघळलं आहे.
पंजाब सीमेवर आधीच त्यांनी एक महामार्ग रोखून धरला आहे. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल हे शेतकरी संघटनांशी चर्चा करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली मात्र कोंडी फुटली नाही. दरम्य शहा यांनी पंजाबमधल्या भाजपच्या नेत्यांची आंदोलन आणि राज्यातल्या परिस्थितीबाबत आज चर्चा केली.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंजाबमधल्या कारागृहांचे DIG लक्षमिंदर सिंह जाखड यांनी राजिनामा दिला आहे. आता आंदोलनात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
Rajasthan: Security personnel put barricades near Jaisinghpur-Khera border (Rajasthan-Haryana).#FarmersProtest pic.twitter.com/Br4Q0XxmpI
— ANI (@ANI) December 13, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुन्हा एकदा कृषी कायद्यांचं समर्थन केलं होतं, नवीन कृषी कायद्यामुळे शेती आणि त्यासंबंधातील विभागातील अडथळा दूर होईल. या नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन बाजारपेठा उपलब्ध होईल. सध्या भारतीय शेतकरी स्वत:चे उत्पादन बाजारात आणि बाहेरही विकू शकतो. याशिवाय विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरदेखील ते आपले उत्पादनाची विक्री करू शकतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे व त्यांना अधिक समृद्ध करण्यासाठी आम्ही विविध प्रकारच्या योजना राबवित आहोतअसंही पंतप्रधान म्हणाले होते.