शेतकऱ्यांचं आंदोलन: आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू, 12 दिवसांमध्ये मृतांची संख्या गेली 8 वर

शेतकऱ्यांचं आंदोलन: आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू, 12 दिवसांमध्ये मृतांची संख्या गेली 8 वर

सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून त्यात तोडगा निघालेला नाही. आता उद्या आणखी चर्चा होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 08 डिसेंबर:  शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान (Farmer Movement) आणखी एका शेतकऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू (Farmer Death) झाला आहे. हा शेतकरी टिकरी बॉर्डरवर (Tikri Border) वर प्रदर्शनात सहभागी झाला होता. सोमवारी त्याची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना बहादुरगढ इथल्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात विविध कारणांमुळे 12 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

कडाक्याची थंडी, दुपारचं उन आणि खाण्यापिण्याची आबाळ यामुळे वयोवृद्ध शेतकऱ्यांना त्रास होतोय. त्यातूनच काहींची प्रकृती बिघडली तर काही अपघातामुळे मृत्यूमुखी पडले. मंगळवारी भारत बंदचं आयोजन शेतकऱ्यांनी केलं होतं. त्यामुळे आंदोलन स्थळी जास्त गर्दी झाली आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेली नवी कृषी विधेयकं परत घेण्यात यावीत यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून त्यात तोडगा निघालेला नाही. 9 डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सहाव्यांदा चर्चा होणार आहे. यापूर्वी पाच वेळा झालेल्या चर्चेतून कोणताही निष्कर्ष आलेला नाही. त्यामुळे आता उद्या 9 डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 8, 2020, 3:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या