नवी दिल्ली 18 जानेवारी : लोकसभा निवडणुका जवळ आल्याने त्याची जोरदार चर्चा आता सोशल मीडियावरही सुरू झालीय. निवडणुकींच्या तारखांबाबत खोट्या बातम्या येत असल्याने त्याची दखल आता खुद्द निवडणूक आयोगानेही घेतलीय. अशा बातम्या पसरविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा निवडणुक आयोगाने दिलाय.
गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सअॅपवर निवडणुकांच्या तारखांबाबात अनेक बातम्या येत आहेत. निवडणुका केव्हा सुरू होणार, केव्हा संपणार, किती टप्प्यात होणार अशी माहिती त्यात असते. 7 एप्रीलला निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असून 17 मे पर्यंत निवडणुक संपणार असल्याची माहिती पसरत असल्याने आयोगाने चिंता व्यक्त केलीय.
दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून FIR दाखल करण्यात सांगण्यात आल्याची माहितीही निवडणुक आयोगाने दिली आहे. खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही आयोगाने केलं आहे.
दानवेंनी आधीच सांगितली होती तारिख
'लोकसभा निवडणुकांची अधिसूचना 2 किंवा 3 मार्चला निघणार आहे,' असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी धुळ्याला केलं होतं . धुळ्यातील नगरसेवकांशी बोलताना रावसाहेब दानवेंनी हे विधान केल्याची माहिती आहे.
'2 किंवा 3 मार्चला लोकसभा निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा,' असं रावसाहेब दानवे धुळ्यातील भाजप नगरसेवकांसोबत झालेल्या बैठकीत म्हणाले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून कोणतीही अधिकृत घोषणा होण्याआधीच दानवेंना याची चाहूल कशी लागली, असा सवाल उपस्थित झाला आहे.
पंतप्रधान मोदी कुठून लढणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणुका या ओडिसामधून लढू शकतात असा दावा भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार प्रदीप पुरोहित यांनी बुधवारी केला आहे. निवडणुका लढण्यासाठी कोणतेही पंतप्रधान नकार देऊ शकत नाहीत. ओडिसाच्या पुरी शहरातून पंतप्रधान मोदी निवडणुका लढण्याच्या 90 टक्के शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी हे गेल्यावेळेस वाराणसी आणि बडोदा या दोन ठिकाणांहून निवडणूक लढले होते. ते यावर्षी कुठून निवडणूक लढणार असा सस्पेंस होता. नरेंद्र मोदी हे आगामी निवडणूक वाराणसी येथून लढणार असल्याचं अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं.
'कुणाला चांगले वाटावे यासाठी आम्ही कधीच निर्णय घेतले नाहीत, तर चांगले परिणाम देणारे निर्णय आम्ही घेतले आहेत. युती करून आम्ही सत्ता मिळवली, पण देशहिताचेच निर्णय आम्ही घेतले. त्यात आम्ही कधी समझौता केला नाही.' असंही अमित शहा म्हणाले होते.
तर एकीकडे'पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिसाच्या लोकांवर खूप प्रेम करतात आणि पुरी शहर हे त्यांच्या जिव्हाळ्याचं आहे. त्यामुळे ते पुरीमधून निवडणुका लढतील' असं प्रदीप पुरोहित यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
VIDEO : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हा लागणार हे दानवेंनी आत्ताच सांगितलं टाकून!