नवी दिल्ली, 4 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi leh visit)यांनी शुक्रवारी अचानक लेहला भेट देऊन सीमेवर चीनशी सामना करणाऱ्या सैनिकांचं मनोबल उंचावलं. त्यांनी गलवान खोऱ्यातल्या संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांशीही संवाद साधला. त्यासाठी ते लष्कराच्या लेहमधल्या रुग्णालयात गेले होते. पण पंतप्रधानांची ही भेट आणि संवाद Fake असल्याच्या शंका काही जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदींचे हे जखमी सैनिकांशी संवाद साधतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्याबरोबर काहींनी त्यावर शंका घ्यायला सुरुवात केली. #Munnabhai असा हॅशटॅगसुद्धा ट्रेण्ड होऊ लागला. मोदी येणार म्हणून कॉन्फरन्स रूमचं हॉस्पिटल करून फोटोची संधी साधली, असं बोललं जाऊ लागलं. मोदींचे टीकाकार मोदींनी फोटो ऑपॉर्चिनिटी आणि प्रसिद्धीसाठी हा देखावा केला, असा आरोप करू लागले.
एकही डॉक्टर, परिचारिका किंवा रुग्णोपयोगी साहित्य नाही, असं कसं हॉस्पिटल असेल आणि या अशा सोयी-सुविधांमध्ये आपल्या शूर जवानांना उपचार दिले जातात का, अशा शंकाही उपस्थित केल्या गेल्या.
शेवटी लष्कराकडूनच यावरचं स्पष्टीकरण आलं आणि या सगळ्यावरचा पडदा उठला. लष्कराने एक निवेदन प्रसिद्ध करत लेहमधल्या जनरल हॉस्पिटलबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. लष्कराने म्हटलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह दौऱ्यादरम्यान तिथल्या जनरल हॉस्पिटलला भेट दिली. त्याबद्दल अत्यंत घृणास्पद आणि तथ्यहीन आरोप केले गेले. आपल्या शूर जवानांना दिल्या जाणाऱ्या उपचारांबद्दलही आरोप केले गेले, हे दुर्दैवी आहे. आपलं लष्कर जवानांची पूर्ण काळजी घेतं आणि सर्वोत्तम उपचार त्यांना मिळतील याची जबाबदारी घेतं."
#IndianArmy clarification on status of facility at General Hospital, Leh.https://t.co/LmEOrk0Hyf pic.twitter.com/s1biqIVpN4
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) July 4, 2020
या फोटोंबद्दल काही सोशल मीडिया यूजर्सनी आक्षेप घेत ते आयत्या वेळी उभारलेलं हॉस्पिटल असल्याचं म्हटलं होतं. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटाप्रमाणे फक्त देखाव्यासाठी ते उभारलं असल्याची शंका काहींनी घेतली.
The army should put its foot down and tell Modi it will not be a part of his marketing gimmicks. This is the limit, turning a conference room into a ward for Photo op#MunnaBhaiMBBS pic.twitter.com/k1DKvl71ti
— Neha (@ShantiseAshanTi) July 4, 2020
Conference Room converted to Hospital.#MunnaBhaiMBBS pic.twitter.com/tZ5Zy6imS0
— Bangali Babu (@trollduniya) July 4, 2020
पंतप्रधानांच्या फोटोमध्ये दिसणारं हॉस्पिटल कॉन्फरन्स रूमसारखं दिसतं या आरोपालाही लष्कराने उत्तर दिलं आहे. "हा लेह जनरल हॉस्पिटल संकुलाचाच भाग आहे. संकटकाळी आणि गरजेपुरती तात्पुरती सोय म्हणून इथे 100 जादा खाटांची सोय करण्यात आली आहे. उपचार संपवून विश्रांती घेणाऱ्या सैनिकांना इथे ठेवलं आहे. Coronavirus च्या प्रादुर्भावामुळे जनरल हॉस्पिटलचा काही भाग COVID आयसोलेशन वॉर्ड म्हणून वापरण्यात येत आहे. त्यामुळे एरवी ऑडिओ व्हिज्युअल ट्रेनिंग रूम असलेली ही खोली नॉन कोविड रुग्णांसाठी सज्ज करण्यात आली आहे. गलवान खोऱ्यात जखमी झालेलेच हे सैनिक आहेत, जे इथे अॅडमिट आहेत. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीही यापूर्वी याच ठिकाणी सैनिकांची विचारपूस केली होती."
संकलन - अरुंधती