नवी दिल्ली, 13 मार्च : केंद्रीय निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर विंग कमांडर अभिनंदन यांचे छायाचित्र असलेले पोस्टर शेअर करणाऱ्या भाजपा नेत्याला दणका दिला आहे. दिल्लीतील भाजपा आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी फेसबुकवर शेअर केलेले दोन पोस्टर हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने फेसबुकला दिले आहेत. या दोन्ही पोस्टरवर अभिनंदन यांचे छायाचित्र होते.
राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी सुरक्षा दलातील कोणाचेही फोटो त्यांच्या राजकीय जाहिरातींसाठी वापरू नयेत, अशा सूचना निवडणूक आयोगाने नुकत्याच दिल्या होत्या. त्यानंतरही भाजप आमदाराने फेसबुकवर अभिनंदन यांच्या फोटोचा वापर केला. त्यामुळे निवडणूक आयोगाने फेसबुकला सूचना देऊन हा फोटो काढण्यास सांगितले.
दरम्यान, राजकीय फायद्यासाठी सैन्याच्या फोटोचा वापर होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने नुकत्याच काही सूचना केल्या आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने 2013 मधील सूचनेचा पुनरूच्चार केला आहे.
'संरक्षण मंत्रालयाने आमच्या नोटिसकडे लक्ष वेधलं आहे की सैन्याच्या छायाचित्रांचा वापर राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि उमेदवार यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारासाठीच्या जाहिरातींमध्ये केला आहे,' असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
दरम्यान, पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअर स्ट्राइकनंतर विविध राजकीय पक्षांनी जवानांच्या फोटोंचा वापर आपल्या पोस्टर्सवर केल्याचं पाहायला मिळालं. तसंच विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटेकनंतरही श्रेय घेणारे राजकीय पोस्टर्स लावण्यात आले होते.
अशा राजकीय पोस्टर्सवर चहुबाजूंनी टीका सुरू झाल्यानंतर आता निवडणूक आयोगानंही याची दखल घेतली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाला जवानांचा आणि सैन्यदलाचा फोटो आपल्या जाहिरातीसाठी वापरता येणार नाही.
VIDEO : मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल-प्रियांकांचा भाजपवर हल्लाबोल