पाटणा (बिहार), 13 एप्रिल : सर्व प्रकारच्या जनजागृती मोहिमा आणि इशारे देऊनही लोक सायबर गुन्हेगारांच्या
(Cyber Crime) जाळ्यात अडकत आहेत. नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे एक व्यावसायिक सायबर गुन्हेगारांच्या तावडीत सापडला आहे. पीडित व्यावसायिकाकडून पैसे उकळण्यात आले. मात्र, सायबर गुन्हेगारांची मागणी वाढतच गेल्याने व्यावसायिकाला पोलिसांकडे जावे लागले. दरम्यान तोपर्यंत हजारो रुपये गमावून बसला होता.
या व्यावसायिकाचा सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून एका महिलेशी संपर्क झाला होता. यानंतर दोघांनी एकमेकांना आपले फोन नंबर दिले आणि मग व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. मग काय? संवादांची ही मालिका अश्लीलतेपर्यंत पोहोचली. एके दिवशी महिलेने या व्यावसायिकाला व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवून पैसे मागायला सुरुवात केली. तसेच जर त्याने पैसे नाही दिले तर ती त्यांचा हा मौजमस्तीचा व्हिडिओ व्हायरल करुन टाकेन, अशी धमकीही त्याला दिली.
महिलेने रेकॉर्ड केला व्हिडिओ -
माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी या व्यावसायिकाकडून सव्वा लाख रुपये उकळले होते आणि दिवसेंदिवस त्यांची मागणी वाढू लागली होती. यानंतर हा व्यावसायिक अस्वस्थ झाला होता. कंकडबाग पोलीस ठाण्यातील अशोक नगरमधील या व्यावसायिकाला महिलेसोबत व्हिडिओवर अश्लिलतेचा प्रकार करणे चांगलेच महागात पडले. या महिलेने स्क्रीन रेकॉर्डिंग करुन हा व्हिडिओ व्हायरल करायची धमकी दिली आणि यानंतर त्याला ब्लॅकमेल करत होती. याचप्रकारे महिलेने व्यावसायिकाकडून सव्वा लाख रुपये उकळले. यानंतरही तिच्याकडून सतत पैशाची मागणी वाढत होती. या व्यावसायिकाने पैशाची मागणी पूर्ण करण्यास असमर्थता व्यक्त केली तर त्याला सायबर सेलचा अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीने फोन केला. तसेच तुरुंगात पाठविण्याची धमकी दिली आणि वेगवेगळ्या क्रमांकावर पैसे जमा करण्यासाठी दबाव टाकला.
महिलेनेच दिली पुरुषाला 'ही' ऑफर -
दरम्यान, चौकशीनंतर पोलीस ज्या अकाऊंटवर सव्वा लाख रुपये टप्प्याने जमा करण्यात आल होते त्याचा अकाऊंट नंबर मोबाईल नंबरचा तपास करत आहेत. माहितीनुसार, काहीच दिवसांपूर्वी व्यावसायिकाने एका महिलेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट (Facebook Friend Request) पाठवली होती. रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर महिला मॅसेंजरवर बोलायला लागली. इतकेच नाही तर तिने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अश्लिलते संदर्भातील ऑफरही त्याला दिली. यानंतर महिलेने व्यावसायिकाचा नंबर मागितला आणि व्हिडिओ कॉलवर संवादाची मालिका सुरू झाली.
व्यावसायिकाने पोलिसांना माहिती दिली की, फेसबुकच्या प्रोफाईलवर वेगळ्या महिलेचा फोटो लावला होता तर व्हिडिओ कॉलवर दुसरीच महिला दिसत होती. अश्लील कृत्य केल्यानंतर महिलेने कॉल डिस्कनेक्ट केला आणि पाच मिनिटांनी व्हॉट्सअॅपचे स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवले. ती महिला राजस्थानी भाषेत बोलत होती. स्क्रीन रेकॉर्डिंग इंटरनेट मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन UPI च्या माध्यमातून 5-10 हजार हप्ते खात्यात जमा करू लागली होती. याप्रकारे तिने व्यावसायिकाकडून तब्बल सव्वा लाख रुपये उकळले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.