Home /News /national /

Facebook च्या माध्यमातून जनतेची दिशाभूल; भारतातही निवडणुकीदरम्यान झाला गैरवापर, माजी कर्मचाऱ्याच्या दाव्याने खळबळ

Facebook च्या माध्यमातून जनतेची दिशाभूल; भारतातही निवडणुकीदरम्यान झाला गैरवापर, माजी कर्मचाऱ्याच्या दाव्याने खळबळ

भारतात निवडणुकीच्या दरम्यान हजारो Facebook फेक अकाउंट्स निर्माण करून जनमत वळवण्यात आलं, असा खळबळजनक दावा फेसबुकच्याच्या माजी डेटा सायंटिस्टनी केला आहे.

    नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : सध्या फेसबुक (Facebook) विविध गोष्टींमुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून फेसबुकच्या युजर्सची अकाउंट हॅक होत असल्याचे आणि त्यांच्या डेटा गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता फेसबुकमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका महिलेने खळबळजनक खुलासा करणारा मेमो शेअर केला आहे.  फेसबुकच्या माजी  डेटा सायंटिस्ट असलेल्या कर्मचाऱ्याने Facebook च्या माध्यमातून लोक राजकीय अजेंडा राबवतात, तो कशाप्रकारे यशस्वी होतो, याचा लेखाजोखा मांडला आहे. डेटा सायंटिस्ट म्हणून पूर्वी फेसबुकमध्येच काम करणाऱ्या सोफी जेंग यांनी फेसबुकच्या माध्यमातून लोकांची कशी दिशाभूल केली जाते, यासंदर्भात एक नोट लिहिली आहे. निवडणुकांदरम्यान आपापल्या फायद्यासाठी आणि जनमत तयार करण्यासाठी रीतसर फेसबुकचा कसा वापर होतो, यावर सोफी यांच्या नोटमुळे प्रकाश पडला आहे. भारतातही हे प्रकार होतात, असं सोफी यांनी लिहिलं आहे. सोफी यांची ही नोट तब्बल 6600 शब्दांची आहे. यातून त्यांनी फेसबुकवर देखील अनेक आरोप केले आहेत. यामुळे भारतात देखील खळबळ उडणार आहे. निवडणुकांच्या दरम्यान कोणते देश आपल्या जनमत वळवण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी कसा अजेंडा राबवतात तेदेखील या नोटमध्ये नावं घेऊन सांगितलं आहे. यामध्ये अझरबैजान, होंडुरास, यूक्रेन, स्पेन, ब्राजील, बोल्विया आणि  इक्वाडोर याबरोबर भारताचा समावेश आहे. निवडणुकांच्या काळात हे देश बनावट फेसबुक अकाऊंटच्या मदतीने आपल्या देशातील नागरिकांचे निवडणूक काळातील मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर विशिष्ट अजेंडा देखील या फेक अकाऊंटवरून प्रसारित करण्यात येतो. ठराविक पोस्ट व्हायरल केल्या जातात. फेसबुकच्याम माध्यमातून बिनदिक्कत हे काम सुरू होतं, असं सोफी जेंग यांनी या नोटमध्ये सांगितलं आहे. "मी फेसबुकमध्ये तीन वर्षं काम केलं असून यामागे कोण आहे याची मात्र मला माहिती नाही", असं सोफी यांनी म्हटलं आहे. विविध प्रचार मोहिमांच्या माध्यमातून काही देशांमध्ये निवडणूक काळात राजकीय आणि सामाजिक उलथापालथ केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे विविध देशांची सरकारं या पद्धतीने आपल्या नागरिकांना फसवत असून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर केला जात आहे, असा सोफी यांचा दावा आहे. या नोटमध्ये विविध देशांच्या राजकीय अजेंड्याचा उल्लेखही आहे. भारतासहित अनेक देशांवर यासंदर्भात आरोप केलेले आहेत. या देशांमध्ये राजकीय उद्देशाने फेक अकाऊंटच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे. सोफी जेंग यांच्या नोटमध्ये नेमकं काय? सोफी जेंग यांनी स्पॅनिश आरोग्य मंत्रालयाच्या फेसबुक पेजवर फेरफार करणारी सुमारे सात दशलक्ष बनावट खाती हटविण्यात मदत केली होती. जगभरातल्या कोरोनव्हायरसबद्दल चुकीचा, दिशाभूल करणारा मजकूर पसरवला जात होता. सरकारसाठी डोकेदुखी ठरणारी ही बनावट खाती नष्ट करण्यात सोफी यांनीच स्पेन सरकारला मदत केली होती. सोफी जेंगच्या नोटमध्ये भारतातील  निवडणुकांसंदर्भात उल्लेखही आहे. "दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान हजारो चित्रपट कलाकारांचा सहभाग असलेली अनेक बनावट खाती सापडली होती. राजकीय पक्षांशी संबंधित ती खाती असून दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान ती मोठ्या प्रमाणात सक्रिय होती. मात्र फेसबुकने हे कधीही उघड केले नाही." रशिया आणि अमेरिकेसंदर्भात देखील सोफी यांनी मोठा खुलासा केला असून 2019 मध्ये नाटोच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं होतं की, रशिया अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ करण्याचा प्रयत्न करत असून अमेरिकेच्या सांगण्यावरून काही खाती बंद करण्यात आली, असं सोफी म्हणतात. त्याचबरोबर ब्राझीलच्या सरकारच्या बाजूने साकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी एक कोटीहून अधिक फेक कमेंट करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता जेंग यांच्या या नोटनंतर जगभरात याचे काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Facebook

    पुढील बातम्या