नवी दिल्ली 14 फेब्रुवारी : आजचा दिवस म्हणजेच 14 फेब्रुवारी हा प्रत्येक भारतीयसाठी काळा दिवस आहे. 2 वर्षापूर्वी 14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला (Pulwama Attack) करण्यात आला होता. या भ्याड हल्ल्यात भारताचे 45 जवान हुतात्मा झाले होते. आता पुन्हा दोन वर्षानंतर याच दिवशी मोठ्या हल्ल्याच्या कट उधळून लावण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली असून जम्मूच्या बस स्थानकातून 7 किलो विस्फोटक साहित्य (Explosive Material) जप्त करण्यात आलं आहे. या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
याबद्दलची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्वीट करत दिली आहे. सायंकाळी साडेचार वाजता जम्मू विभागाचे आयजीपी मुकेश सिंह माध्यमांना संबोधित करतील आणि या विषयावर अधिक माहिती देतील.
पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्फोटक आढळण्याचा अर्थ मोठा हल्ला घडवण्याचा कट होता. या विस्फोटकांसोबतच एक संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि मोठ्या बाजारात हल्ला घडवण्याचा कट रचला गेला होता.
Jammu and Kashmir: Explosive material recovered from Jammu bus stand. More details awaited.
— ANI (@ANI) February 14, 2021
याच दिवशी झाला होता पुलवामा हल्ला -
काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे लष्करी ताफ्यावर फेब्रुवारीत आत्मघातकी हल्ला झाला होता. पठाणकोटनंतर झालेला हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जातो. त्यानंतर भारताने हवाई लक्ष्यभेदी हल्ला करून दहशतवादी तळ नष्ट केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu and kashmir