नवी दिल्ली, 19 मे: लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक मास्टर स्ट्रोक मारला होता. ज्या निर्णयाची गेली अनेक वर्षी चर्चा सुरु होती तो निर्णय थेट राहुल गांधी यांनी घेतला. इंदिरा गांधी यांच्या सारख्या दिसणाऱ्या प्रियांका गांधी यांना पक्षातील पद दिले. राहुल गांधींनी प्रियांका यांना पक्षातील सरचिटणीसपद दिले. इतक नव्हे तर यासोबत त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पूर्व उत्तर प्रदेश अर्थात पूर्वांचलची जबाबदारी दिली.
राहुल गांधींच्या या निर्णयामुळे सर्वच राजकीय तज्ञांनी त्यांचे कौतुक केले होते. ज्या निर्णयाची सर्वच काँग्रेसचे नेते वाट पाहत होते तो निर्णय राहुल गांधी यांनी घेतला होता. राहुल गांधी यांनी फक्त प्रियांका यांना सक्रीय राजकारणात आणले नाही तर लोकसभा निवडणुकीत थेट मोदी आणि अमित शहा यांच्या समोर उभे केले. राहुल गांधी यांनी लोकसभेसाठी प्रियांका गांधी यांच्याकडे पूर्व उत्तर प्रेदशची जबाबदारी दिली.
पूर्वांचलमध्ये लोकसभेच्या एकूण 23 जागा आहेत. यात अमेठी, रायबरेली या दोन मतदारसंघासह वाराणसी हा मोदींचा मतदारसंघ देखील येतो. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड असलेला गोरखपूर मतदारसंघ देखील प्रियांका यांच्या कार्यक्षेत्रात येतो.या शिवाय फैजाबाद, गोरखपूर, आझमगढ, अखिलेश यादव यांचा मुबारकपूर, आंबेडकरनगर, गाझीपूर, अलाहाबाद, देवरिया हे देखील महत्त्वाचे मतदारसंघ पूर्व उत्तर प्रदेशात आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान प्रियांका गांधी यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार केला. वाराणसीत देखील त्यांचा रोड शो झाला. अमेठीमध्ये राहुल गांधींसाठी तर रायबरेलीत सोनिया गांधी यांच्यासाठी प्रियांका सक्रिय होत्या. केवळ काँग्रेसचे कार्यकर्ताच नव्हे तर काँग्रेसच्या मतदारांच्या नजरा प्रियांका गांधींवर होत्या. त्यामुळेच निवडणुकीत त्यांना दिलेल्या प्रदेशात काँग्रेसची कमगिरी कशी झाली यावर सर्वांचेच लक्ष होते.
न्यूज 18 लोकमतच्या एक्झिट पोल नुसार पूर्व उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 1-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ 2014च्या निकालाप्रमाणे काँग्रेसला त्यांचे गड असलेल्या अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघातच विजय मिळण्याची शक्यता आहे. 23 मेच्या निकालात जर हाच निकाल कायम राहिला तर प्रियांका गांधी यांचा प्रभाव काहीच पडला नसल्याचे आढळते.
संपूर्ण उत्तर प्रदेशचा विचार केल्यास भाजपला पुन्हा एकदा घवघवीत असे यश मिळाले आहे.राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सपा-बसपा आघाडी याचा विरोधकांचा काहीच परिणाम भाजपवर झाला नाही. न्यूज 18 च्या एक्झिट पोल नुसार सहा टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या 67 जागांपैकी भाजपला 50-54 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर सपा-बसपा आघाडीला 12-16 जागा मिळण्याची शक्यता आहे.