भोपाळ, 16 मे : लोकसभेच्या निवडणुकांचे अंतिम निकाल समजायला आता अगदी थोडे दिवस बाकी आहेत. सातव्या टप्प्यातलं मतदान येत्या 19 मे ला होईल आणि त्याच संध्याकाळी एक्झिट पोलचे अंदाज उघड होतील. त्या दिवसापासून 23 तारखेपर्यंत कुठल्या पक्षाचं सरकार येणार, कोण बाहेरून पाठिंबा देणारे वगैरे वेगवेगळे अंदाज बांधणं सुरू राहील. पण सरकार कुणाचंही येवो एक रेकॉर्ड मात्र नक्कीच तोडलं जाणार नाही. एक विक्रम अबाधित राहील.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, या वेळी लोकसभा निवडणुका सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम करणारं कुणीच नसेल. देशात आताच्या निवडणुकीला उभा असलेला एकही उमेदवार सर्वाधिक वेळा म्हणजे 10 पेक्षा जास्त वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून यायचा विक्रम मोडू शकणार नाही.
आतापर्यंत भारतात सर्वाधिक वेळा लोकसभेची निवडणूक जिंकण्याचा विक्रम सध्या 2 नेत्यांच्या नावावर आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असणाऱ्या कमलनाथ आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे दोघे 9 वेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. पण हे दोघेही या वेळी निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. यांच्याशिवाय लोकसभेचे माजी सभापती दिवंगत पी. ए. संगमा यांनीही लोकसभेत 9 वेळा निवडून यायचा विक्रम केला आहे.
सध्याच्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, करिया मुंडा, बिजू जनता दलातून भाजपमध्ये सामील झालेले अर्जुनचरण सेठी आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन हे सगळे लोकसभेवत 8 वेळा निवडून गेलेले आहेत. पण यातल्या एकाही दिग्गजाला त्यांच्या पक्षाने या वेळी तिकिट दिलेलं नाही. त्यामुळे सर्वाधिक वेळा संसदेवर निवडून जायचा विक्रमाची यांच्याकडून बरोबरी होणंही शक्य नाही.
या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक पक्षांमधल्या बुजुर्गांना विश्रांती देण्यात आली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी आहेत. हे दोघेही प्रत्येकी 7 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. ते दोघेही या वेळी निवडणुकीच्या रिंगणाबाहेर आहेत. आता भाजपकडून मनेका गांधी सुलतानपूरच्या जागेवर निवडून आल्या तर त्या लोकसभेच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य असतील.
मनोका गांधी यांच्याबरोबरच कर्नाटकच्या कोलारमधून काँग्रेसचे खासदार के. एच. मुनिअप्पा आणि केंद्रीय मंत्री संतोषकुमार गंगवार हे नेतेसुद्धा या वेळी जिंकले आठव्यांदा लोकसभेत जातील. मनेका गांधीसुद्धा आठव्यांदा खासदार होण्यासाठी उभ्या आहेत.
सध्याच्या लोकसभा सदस्यांच्या वयाची सरासरी 55.64 आहे. हे आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासातलं सर्वाधिक वय आहे. पहिल्या लोकसभेत सदस्यांचं सरासरी वय होतं - 46.5 वर्षं. लोकसभा सदस्यांचं सरासरी वय आतापर्यंत सर्वांत कमी म्हणजे 46.4 इतकं होतं 12 व्या लोकसभेच्या वेळी. 1998-99 मध्ये लोकसभेचे खासदार तरुण होते. आता सतराव्या लोकसभेचं सरासरी वय किती असेल हे या वेळी तिथे कुणाची वर्णी लागणार हे कळल्यावर स्पष्ट होईल.
VIDEO: नथुराम गोडसे देशभक्तच, साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त वक्तव्य