गंगा स्वच्छतेसाठी 112 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या स्वामी सानंद यांचं निधन

गंगा स्वच्छतेसाठी 112 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या स्वामी सानंद यांचं निधन

गंगा नदीची सुरक्षा आणि स्वच्छता या मुद्द्यांवरुन 87 वर्षीय स्वामी सानंद हरिद्वार येथील मातृसदन या आश्रमात उपोषण सुरू केलं होतं.

  • Share this:

ऋषीकेश, 11 आॅक्टोबर : गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी मागील 112 दिवसांपासून उपोषण करणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि प्राध्यापक जीडी अग्रवाल उर्फ स्वामी ज्ञानस्वरूप सानंद यांचं निधन झालं आहे. स्वामी सानंद यांचं आज (गुरुवारी) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, असं एम्सकडून सांगण्यात आलंय.

गंगा नदीची सुरक्षा आणि स्वच्छता या मुद्द्यांवरुन 87 वर्षीय स्वामी सानंद हरिद्वार येथील मातृसदन या आश्रमात उपोषण सुरू केलं होतं. काल (बुधवारी) त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावल्याने प्रशासनाने जबदस्तीने त्यांना ऋषीकेशमधील एम्स रुग्णालयात दाखल केलं. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कोण होते स्वामी सानंद ?

कानपूर आयआयटीत प्राध्यापक राहिलेल्या स्वामी सानंद यांचं मुळ नाव जीडी अग्रवाल असं होतं. पर्यावरणवादी अशी ओळख असणारे जीडी अग्रवाल विज्ञानाकडून अध्यात्माकडे वळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा स्वच्छतेबाबत संसदेत कायदा बनवण्याचं आश्वासन द्यावं, अशी मागणी करत स्वामींनी 22 जूनपासून उपोषण सुरू केलं होतं.

यादरम्यान, अनेक केंद्रीय मंत्री तसंच खासदारांनी आश्रमात येऊन स्वामी सानंदांकडे उपोषण सोडण्याची विनंती केली. पण खुद्द पंतप्रधानांनी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका सानंद यांनी घेतली. 112 दिवसाच्या उपोषणानंतर आज अखेर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

=======================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 08:13 PM IST

ताज्या बातम्या