जबलपूर 14 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्याला (Pulwama Attack) आज 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. 14 फेब्रुवारी 2019 चा तो काळा दिवस भारतीय कधीच विसरू शकणार नाही. या हल्ल्यात 45 जवानांना (Soldiers) वीरमरण आलं होतं. जम्मू- काश्मीर राष्ट्रीय महामार्गावरील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सैनिकांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला होता. यात 45 जवान हुतात्मा झाले होते. या हृदयद्रावक घटनेत मध्य प्रदेशचा एक वीर पुत्रदेखील होता. जो देशासाठी हुतात्मा झाला.
मध्य प्रदेशच्या खुडावर गावातील अनेक तरूण सैन्यात दाखल होत देशासाठी आपला जीव देण्यासही तयार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले अश्विन हेदेखील याच गावचे तिसरे असे पुत्र होते, जे देशासाठी शहीद झाले. अश्विन आता या जगात नसले तरीही आपल्या गावाची मान उंचवण्याचं काम त्यांनी केलं आहे. अश्विन यांना जगाचा निरोप घेऊन आता 2 वर्ष झाली आहेत. मात्र, घरच्यांच्या आठवणीत ते आजही जिवंत आहेत. अश्विन यांचे वडील सुकरू काछी यांनी न्यूज 18 सोबत साधलेल्या संवादात आपलं दुःख व्यक्त केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मनावर मुलाच्या मृत्यूमुळं झालेला घाव कधीच भरून निघू शकत नाही.
अश्विन यांच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, सेनेत भर्ती होण्यासाठी अश्विन यांनी प्रचंड मेहनत घेतली. एकदा सेनेत भर्ती होण्याआधी मेडीकल फिटनेसमध्ये ते बाहेर निघाले. मात्र, वडिलांनी अश्विन यांना कधीच हार मानू नको, असा सल्ला दिला. पुढे अथक परिश्रमानंतर अश्विन 2017मध्ये सेनेत भर्ती झाले. अश्विनच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा शहीद झाला, मात्र त्यांना तो सन्मान देऊन गेला जो कदाचित त्यांना कधीच मिळाला नसता.
कुटुंबीय करतात मुलाची पुजा -
अश्विन यांच्या घरात आज एक छोटं मंदीर आहे. इथे कोणत्या देवाचे नाही तर अश्विन यांचा फोटो आहे. अश्विन यांच्या सर्व आठवणी यात सजवून ठेवण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तक अश्विन यांची वर्दी आणि ज्या तिरंग्यात त्यांचं पार्थिव आणलं गेलं तो तिरंगादेखील तिथे सांभाळून ठेवण्यात आला आहे.
गावातील अनेक जवानांनी केली देशाची सेवा -
3 हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावातील 100 जवानांनी आतापर्यंत सेनेमध्ये काम केलं आहे. सध्या येथील तब्बल 30 सैनिक सीमेवर तैनात आहे. अश्विन यांच्याआधी या गावचे आणखी दोन जवान शहीद झालेले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.