Home /News /national /

एल्गार परिषद : गौतम नवलखा आयएसआयच्या संपर्कात; NIA चा खळबळजनक आरोप

एल्गार परिषद : गौतम नवलखा आयएसआयच्या संपर्कात; NIA चा खळबळजनक आरोप

एल्गार परिषद प्रकरणी एनआयएने चार्जशीटमध्ये खळबळजनक आरोप केले आहेत. गौतम नवलखा सीपीआय-एम आणि पाकिस्तानची आयएसआय यांच्या संपर्कातला दुआ असल्याचा उल्लेख एनआयएने चार्जशीटमध्ये केला आहे.

    नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : एल्गार परिषद प्रकरणी एनआयएने चार्जशीटमध्ये खळबळजनक आरोप केले आहेत. गौतम नवलखा सीपीआय-एम आणि पाकिस्तानची आयएसआय यांच्या संपर्कातला दुआ असल्याचा उल्लेख एनआयएने चार्जशीटमध्ये केला आहे. एनआयएनेने मागच्या आठवड्यात स्पेशल कोर्टात 8 जणांविरोधात चार्जशीट दाखल केली. गौतम नवलखा यांच्याबरोबरच हनी बाबू, स्टॅन स्वामी, आनंद तेलतुंबडे, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप आणि मिलिंद तेलतुंबडे यांची नावंही या चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आली आहेत. 10 हजार पानांच्या या चार्जशीटमध्ये नवलखा आणि आयएसआय लॉबिस्ट गुलाम अहमद फाय यांच्या संपर्काबाबत 62 पानांवर माहिती देण्यात आली आहे. सीएनएन- न्यूज 18 यांच्या हातात ही चार्जशीट लागली आहे. 'तपासामध्ये गौतम नवलखा तीनवेळा अमेरिकेला गेले होते. यावेळी त्यांनी काश्मिरी अमेरिकन काऊन्सिलच्या कॉन्फरन्सचा संबोधित केलं. ही कॉन्फरन्स गुलाम नबी फाय यांनी आयोजित केली होती. नवलखा फाय यांच्यासोबत फोन आणि gnavlakha@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून संपर्कात होते,' असं या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. गुलाम नबी फायला एफबीआयने जुलै 2011 मध्ये आयएसआयकडून निधी घेतल्याप्रकरणी अटक केली होती. नवलखा यांनी फायला माफी देण्यात यावी, यासाठी अमेरिकेच्या न्यायाधिशांना पत्रही लिहिलं होतं. या पत्राचा उल्लेख अमेरिकेच्या कोर्ट ऑर्डरमध्येही आहे, असंही चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे. गौतम नवलखा आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांची भेट फायनेच घडवून आणली, असंही एनआयएने मुंबईच्या कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये सांगितलं आहे. तसंच नवलखा यांची डिजीटल डॉक्युमेंट जप्त केल्यानंतर त्यांचा माओवादी आणि आयएसआय यांच्याशी संबंध असल्याचा दावाही एनआयएने केला आहे. 'गौतम नवलखा यांनी स्वतंत्र काश्मीर आंदोलन आणि माओवादी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या व्यासपीठावर भाषणं केली. नवलखा यांच्याकडून जप्त केलेल्या कागदपत्रांचा सखोल तपास केल्यानंतर ही सीपीआय-एमची रणनिती ठरवणारी असल्याचं सिद्ध होत आहे,' असंही चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या चार्जशीटमध्ये दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर हनी बाबू यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. हनी बाबू यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना माओवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. हनी बाबू यांच्या घरी धाड टाकली असता गौतम नवलखा यांच्याशी संपर्क करण्यासाठी सांकेतिक नावांचा वापर करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसंच झारखंडमधल्या स्टॅन स्वामी यांनी सीपीआय-एमकडून पैसे घेतल्याचा दावाही या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. 'तपासामध्ये स्वामी यांनी कॉमरेड मोहन यांच्याकडून 8 लाख रुपये घेतले. हे पैसे सीपीआय-एमच्या कारवाया वाढवण्यासाठी घेतले गेले होते. सीपीआय-एमची संघटना असलेल्या पीपीएससी या संस्थेचे स्वामी संचालक होते. स्वामी यांच्याकडून मिळालेली बहुतेक कागदपत्र सीपीआय-एमच्या कारवाया वाढवण्यासंदर्भातली आहेत,' असा आरोप या चार्जशीटमध्ये करण्यात आले आहेत. 'स्वामी यांच्याकडून नक्सलबारीचं 50 वर्षांचं साहित्य, सीपीआय-एमची प्रसिद्धी पत्रकं, केंद्रीय समितीची परिपत्रकं, प्रशांत नावाच्या व्यक्तीला लिहिलेलं पत्र, तसंच विजयन दादा यांना लिहिलेल्या पत्रात आदिवासींना एकत्र करण्याचा उल्लेख, सीपीआय-एमच्या 13व्या वर्धापनदिनाबाबतचे मेसेज, या गोष्टी आढळल्याचं, एनआयएने सांगितलं आहे. सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी एप्रिल 2018 साली टाकलेल्या धाडीतील कागदपत्रांमध्येही स्वामी यांचा उल्लेख होता. कॉमरेड सुधा आणि कॉमरेड प्रकाश यांच्यातल्या पत्र व्यवहारांमध्ये स्वामी यांच्या भूमिका मांडण्यात आल्या होत्या. स्वामी यांच्यावर तंत्रज्ञान माहिती नसलेल्या माओवादी कार्यकर्त्यांना तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्याचाही आरोप करण्यात आला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या