लोकसभा 2019 : ....तर निकालासाठी लागू शकतात 2- 3 दिवस; कल स्पष्ट व्हायलाही दुपार उजाडणार

यंदा कल समोर येण्यासाठी विलंब लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण निकाल स्पष्ट होण्यासाठी कदाचित दोन ते तीन दिवसही लागू शकतात.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 02:33 PM IST

लोकसभा 2019 : ....तर निकालासाठी लागू शकतात 2- 3 दिवस; कल स्पष्ट व्हायलाही दुपार उजाडणार

नवी दिल्ली, 22 मे : मतदानयंत्र वापरात आल्यापासून निवडणुकांचे निकाल लवकर लागतात, असा आतापर्यंतचा  अनुभव होता. कोण आघाडीवर आहे त्यानुसार कल तर सकाळी काही तासात स्पष्ट व्हायचे. पण यंदा कल समोर येण्यासाठी विलंब लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण निकाल स्पष्ट होण्यासाठी कदाचित दोन ते तीन दिवसही लागू शकतात. VVPAT च्या मतपावत्यांची मोजणी करावी, अशी मागणी असल्याने त्याची पडताळणी संपेपर्यंत निकाल जाहीर करता येणार नाहीत.

विरोधी पक्षांच्या 21 नेत्यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे VVPAT मशीमधल्या मतपावत्या प्रथम मोजण्याची मागणी केली होती. त्यावर निवडणूक आयोगानं अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यासाठी आत्ता बैठक सुरू आहे. त्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, त्यानुसार पहिला कल किती वाजता लागेल याचा अंदाज बांधता येईल.

लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक विधानसभेतल्या 5 मतदान केंद्रातल्या VVPAT मशीनमधील मतपावत्यांची मोजणी प्रथम करावी. ती EVM मशीनबरोबर पडताळून पाहावी. या दोन आकड्यांत काही फरक दिसला तर सर्व VVPAT च्या मतपावत्यांची मोजणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विरोधी पक्षांची ही मागणी निवडणूक आयोग मान्य करू शकतो. असं झालं तर प्रत्यक्ष मतदानयंत्रांची EVM मतमोजणी सुरू व्हायला दुपार उजाडेल.

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार एका फेरीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या फेरीला सुरुवात होते.

एका लोकसभा मतदारसंघात किमान 5 विधानसभा क्षेत्रांचा समावेश असतो. त्यामुळे मतमोजणीची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रांतले आकडे एकत्र करून मग लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या फेरीचे निकाल जाहीर करण्यात येतात. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. याच पद्धतीने मतगणना करावी असे आदेश निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या प्रशासनाला दिले आहेत.

Loading...

याशिवाय जर VVPAT मतपावत्यांची गणना सुरू केली, तर दुपारपर्यंत तीच सुरू राहील आणि प्रत्यक्ष मतमोजणी त्यानंतर सुरू केली जाईल. निवडणूक आयोगाने VVPAT मतपावत्यांच्या मोजणीविषयी अद्याप कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नव्हते. EVM मशीनची मोजणी पूर्ण झाल्यानंतर फक्त खातरजमा करण्यासाठी कोणत्याही 5 मतदान केंद्रातल्या मतपावत्यांची मोजणी करण्यात येणार होती. असं झालं तर मतमोजणी प्रक्रिया तुलनेनं लवकर संपू शकते. पण विरोधकांची मागणी लक्षात घेऊन आयोगाने आधी VVPAT उघडलं तर मात्र एकूणच निकाल येण्यासाठी काही दिवसही लागू शकतात.

दिल्लीचे निवडणूक आयुक्त रणबीर सिंह यांनी बुधवारी सांगितलं करी, EVM मशीनच्या मतजोणीला 8-10 तास लागतात. त्यानंतर VVPAT मतपावत्यांची गणना सुरू केली तर त्यासाठी पुढचे 5-6 तास लागू शकतील. पूर्ण निकाल हाती यायला या हिशोबाने गुरुवारी रात्री 10- 12 वाजू शकतात. पण विरोधी पक्ष म्हणतात, तशी प्रक्रिया उलटी केली, तर यापेक्षा जास्त वेळ लागेल.

विरोधी पक्षांनी खरं तर सुरुवातीपासून 50 टक्के VVPAT मशीनमधल्या मतपावत्यांची मोजणी करावी, अशी मागणी केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 01:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...