News18 Lokmat

सरकारी नोकरी मिळाली नाही म्हणून 'या' नाराज तरुणाने सरकारविरोधात उभा केला लाखोंचा जमाव

पाटिदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सरकारी नोकरी न मिळालेला नाराज तरुण ते लाखोंचा जमाव आणणारा 22 वर्षांचा तरुण... हार्दिक पटेल यांच्या जामनगरच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं आहे कारण...

News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2019 06:46 PM IST

सरकारी नोकरी मिळाली नाही म्हणून 'या' नाराज तरुणाने सरकारविरोधात उभा केला लाखोंचा जमाव

अहमदाबाद, 12 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होम ग्राऊंडवर भाजपला पराभूत करण्यासाठी आता काँग्रेसनं कंबर कसली आहे. त्यासाठी आता काँग्रेसला पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी 'हात' दिला. पाटिदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जामनगरमधून हार्दिक पटेल लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यावर बोलण्यास हार्दिक पटेल यांनी मात्र नकार दिला आहे.

काँग्रेसच्या कार्यकारिणीची अहमदाबाद येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये हार्दिक पटेल यांनी काँग्रेस प्रवेश केला.


सरकारी नोकरी न मिळालेला नाराज तरुण ते लाखोंचा जमाव आणणारा तरुण

अवघ्या 22 व्या वर्षी सरकारविरोधात जनआंदोलन उभारून लाखोंचा जनसमुदाय उभा करणारे तरुण नेते म्हणून हार्दिक पटेल यांची देशाला ओळख झाली. आरक्षणाची मागणी घेऊन राजकारणात उतरलेले हार्दिक पटेल पाटीदार समाजाचे मोठे नेते मानले जातात.

Loading...

हार्दिक यांचा जन्म एका मध्यमवर्गीय गुजराती घरात 20 जुलै 1993 रोजी झाला. एक मार्क कमी असूनसुद्धा शेजारी राहणाऱ्या मुलाला सरकारी नोकरी मिळाली यामुळे नाराज झालेल्या हार्दिक यांनी आरक्षणासाठी मोहीम उघडली. पुढे त्याचं आंदोलनात रुपांतर झालं. पाटीदार समाजाला आरक्षण मिळावं हा मुद्दा निवडणुकीत मोठा झाला आणि त्याबरोबर हार्दिक पटेल यांचं महत्त्व वाढलं. महिसाणामध्ये एका छोट्या सभेचं रुपांतर विशाल जाहीर सभेत झालं आणि हार्दिक पटेल या नावाकडे देशाचं लक्ष वेधलं गेलं.


हार्दिक यांचं आव्हान

हार्दिक पटेल यांच्या रूपानं काँग्रेसनं भाजपसमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जामनगरमधील निवडणूक देखील अधिक चुरशीची होणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्दिक पटेल यांनी आश्चर्यकारकरित्या काँग्रेसकडून जामनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच भाजपने त्यांचा सामना करण्यासाठी विशेष प्लॅन बनवला आहे.

जामनगरमध्ये सत्वरा, पटेल, अहिर, मुस्लीम, दलित आणि क्षत्रिय मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच या सगळ्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करतंय. या समाजाच्या नेत्यांना आपल्याकडे वळवून हार्दिक पटेल यांना टक्कर देण्याचा हा प्लॅन आहे.


जामनगर मतदारसंघ

जामनगर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभेच्या 4  जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत तर 3 जागा भाजपकडे आहेत.

2014मध्ये भाजपच्या पूनम माडम यांनी जामनगरची जागा जिंकली. या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला गुजरात राज्यातल्या सर्वच्या सर्व जागा मिळाल्या होत्या. जामनगर लोकसभा मतदारसंघात 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. पण त्याआधी ही जागा भाजपकडे होती.

2014 लोकसभा निकालजामनगर एकूण मतदार - 14,70,952

पुरुष मतदार -   7,71,004


महिला मतदार-  6,99,948


2014 ला काय झालं?


पूनमबेन माडम -  भाजप - 484,412 मतं (56.8%)


अर्जुनभाई माडम, काँग्रेस- 309,123 मतं (36.3%)


पाटीदार अमानत आंदोलनाच्या माध्यमातून हार्दिक पटेल हे राजकारणात सक्रिय झाले. 2016 मध्ये त्यांनी भाजपच्या आनंदीबेन पटेल सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. पटेल समुदायाचा ओबीसींमध्ये समावेश करावा, अशी त्यांची मागणी होती. शिक्षण आणि नोकरीत आरक्षणासाठी हार्दिक पटेल यांनी मोठमोठ्या सभा घेतल्या.

संबंधित बातम्या : हार्दिक पटेल यांना आव्हान देण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन


संबंधित बातम्या : आश्वासने देणाऱ्यांना विचारा 15 लाख कुठे गेले? मोदींच्या बालेकिल्ल्यातून प्रियांका गांधींचा हल्लाबोल


गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पटेल समुदायाचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघांची राजकीय समीकरणं बदलली होती पण आता मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर परिस्थिती बदलली आहे.

मध्यंतरी, हार्दिक पटेल ज्या पटेल समुदायातून येतात त्या पटेल समुदायाने नरेंद्र मोदींना एका सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं. मोदींनी अहमदाबादमधल्या या समाजाच्या मंदिराचं भूमिपूजन केलं. पटेल समुदाय मोदींच्या बाजूने आहे हेच या समुदायाला दाखवायचं होतं.

गुजरात विधानसभेनंतर आता दीड वर्षांनी लोकसभा निवडणूक होतेय. या बदललेल्या परिस्थितीत काँग्रेसला हार्दिक पटेलचा करिश्मा किती उपयोगी पडेल हे पाहावं लागेल.


VIDEO : गुजरातमधील प्रियांका गांधींची पहिली सभा, UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...