नवी दिल्ली, 27 जुलै: रेल्वे कॅटरिंग कंत्राट गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयपाठोपाठ आता ईडीनेही गुन्हा दाखल केलाय. मनी लॉन्ड्रिंगच्या या गुन्ह्यात माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजप्रताप यांनाही आरोपी करण्यात आलंय. विशेष म्हणजे बिहारमधील लालू कुटुंबियांची सत्ता संपुष्टात येताच ईडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे लालू यांच्यासमोरच्या अडचणी आणखीनच वाढल्यात. सीबीआयने देखील या घोटाळ्यात लालू कुटुंबीय आणि संबंधीत कंत्राटदाराविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल केलेला आहे.
काय आहे रेल्वे कॅटरिंगचा घोटाळा?
लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना 2000 साली त्यांनी रांची आणि पुरी इथल्या रेल्वे कॅटरिंगची कंत्राट देताना संबंधीत कंत्राटदाराला झुकतं माप माप दिल्याचा आरोप आहे. बाजारभावापेक्षा कमी दराने ही कॅटरिंगची कंत्राटं दिली गेल्याने रेल्वेचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. याच आर्थिक गैरव्यवहारातून लाच रुपाने मिळालेला पैसा नेमका कुठे गुंतवण्यात आलाय याची ईडीमार्फत चौकशी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.