नवी दिल्ली, 3 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने सुरू झालेल्या ‘नमो टीव्ही’ ला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत हे चॅनल ३१ मार्चला लाँच करण्यात आलं पण ऐन निवडणुकीच्या काळात या चॅनलला परवानगी दिलीच कशी, अशी तक्रार आप ने केली होती. यानंतर काँग्रेसनेही याविरुद्ध तक्रार केली.
यानंतर निवडणूक आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला याबद्दल जाब विचारला आहे. 'नमो टीव्ही' हे परवाना असलेलं चॅनल नाही तर डायरेक्ट टू होम चॅनल आहे, असं माहिती प्रसारण मंत्रालयाने म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाने दूरदर्शनलाही असंच पत्र पाठवलं आहे. मोदींच्या 'मै भी चौकीदार' या जाहीर कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनने केलं होतं. त्यामुळे सरकारी चॅनल प्रचारासाठी वापरल्याचा आरोप भाजपवर करण्यात आला आहे.
'नमो टीव्ही' चा लोगो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून करण्यात आला आहे. या चॅनलवरून मोदींच्या सभेतली भाषणं लाइव्ह दाखवण्यात येतात. त्यामुळेच 'आप' चा याला आक्षेप आहे.एखाद्या चॅनलवर सगळ्या पक्षांना समान स्थान असलं पाहिजे, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे पण इथे तर फक्त भाजपच्या सभा दाखवण्यात येतात, असं सांगत अरविंद केजरीवाल यांनी या चॅनलला आक्षेप घेतला आहे.
या चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर कोण लक्ष ठेवणार ? भाजपने हे चॅनल प्रमाणित करून घेतलं आहे का, असेही प्रश्न केजरीवाल यांनी विचारले आहेत. निवडणूक आयोगाने जर याबद्दल प्रमाणपत्र दिलेलं नाही तर मग या चॅनववर कोणती कारवाई करण्यात आली, याबद्दल आप ने माहितीची विचारणा केली होती.
आप आणि काँग्रेसने या चॅनलबद्दल अनेक प्रश्न विचारल्यामुळे नमो टीव्ही चांगलंच वादात सापडलं आहे.
====================================================================================================================================================
VIDEO: मोदीजी मुद्दे पर आइए, आव्हाडांची ही कविता तुम्ही ऐकली का?