नवी दिल्ली, 16 जानेवारी : दिल्ली एनसीआरची आजची सकाळ दाट धुक्यात गेली. दाट धुक्यामुळे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला. दाट धुक्यात इतका भीषण अपघात झाला की, तब्बल 25 गाड्या एकमेकांवर आदळल्या. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत अनेक छोट्या-मोठ्या गाड्यांचा समावेश आहे.
शनिवारी सकाळी दिल्ली एनसीआरमध्ये दाट धुकं पाहायला मिळालं. धुक्यामुळे गाझियाबाद ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वेवर 25 छोट्या-मोठ्या गाड्यांची एकामागोमाग एक टक्कर झाली. या भीषण अपघाताने ईस्टर्न पेरिफेरल हायवेवर लांबलचक ट्रॅफिक जॅम झालं असून गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अपघातातील गाड्यांना क्रेनच्या मदतीने हटवण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केलं.
(हे वाचा- 5 लीटर पेट्रोल घेऊन पोहोचला पत्नीच्या माहेरी; पहाटे भरझोपेत केलं धक्कादायक कृत्य)
अपघातात एकाचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला असून जखमींना उपचारासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दाट धुक्यात गाडी चालवताना अतिशय सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. गरज नसल्यास या वेळेत प्रवास करणं टाळावं. घरातून या वेळेत निघावंच लागत असल्यास रस्त्याच्या डावीकडून जा, डीपरचा वापर करा, आणि अतिशय हळू प्रवास करण्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
(हे वाचा - मद्यपी वाहनचालकाला 7 दिवसांचा कारावास; सहप्रवासीदेखील तुरूंगात)
हवामान विभागाने दिल्ली एनसीआरमध्ये पुढील काही दिवस अशाचप्रकारे दाट धुकं राहण्याची शक्यता वर्तवली आहे. याआधीही दाट धुक्यामुळे अनेक गाड्या एकमेकांवर धडकून भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे दाट धुक्यात चालकाने वेगावर नियंत्रण ठेऊन सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.