मुंबई 13 मे : महाराष्ट्रातल्या निवडणुका आटोपल्याने आता दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत. सरकार नुसत्या घोषणा करते मात्र त्या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत अशी तक्रार शेतकऱ्यांनी केलीय. दुष्काळाचं राजकारण करू नये असं सरकार म्हणतं मात्र लोकशाहीत राजकारणाव्दारे प्रश्न मांडायचे नाहीत तर विरोधी पक्षांनी भजन कीर्तन करावं असं अपेक्षीत आहे का? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी केलाय. 'न्यूज18लोकमत'च्या बेधडक कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यात मराठवाड्याला दुष्काळाच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. पाणीच नसल्याने अनेक गावांनी स्थलांतर केलंय. माणसं जगण्यासाठी पाण्याची सोय करतील मात्र प्राण्यांनी सोय कशी करणार त्यांच्यासाठी पाणी कुठून आणणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सरकार फक्त घोषणा करतं, त्या हवेतच राहतात त्याकडे लक्ष वेधण्यासाठी राजकारणच करावं लागतं असं मत वानखडे यांनी व्यक्त केलं.
लोकशाहीत राजकारणाव्दारेच प्रश्न मांडावे लागतात. विरोधी पक्षांनी ते चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. ते राजकारण करणार नाहीत तर काय भजन कीर्तन करतील का असा सवालही त्यांनी केला. सगळ्या संकटांमध्ये फक्त शेतकरीच का भरडला जातो असाही प्रश्न त्यांनी विचारला.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सध्या राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. शतेकरी अत्यंत संताप व्यक्त करत असून त्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळे या प्रश्नावर विरोधी पक्ष आणि सरकार पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे.
जागतिक हवामान बदलाचं मराठवाडा हे सर्वात मोठं उदाहरण असल्याचं मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, या प्रश्नाकडे कुणीच गांभीर्याने बघत नाही. सरकार, शेतकरी, सामान्य नागरिक या सर्वांनी मिळून प्रयत्न केले तरच काही मार्ग निघू शकतो नाही तर परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. 400 मिलिमीटर पाऊस पडूनही भुगर्भातल्या पाण्याची पातळी खाली का जाते याचा शोध घ्यायला पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.