नवी दिल्ली 29 नोव्हेंबर: बदलती जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन देशासमोर सुरक्षेचं आव्हानही वाढलं आहे. दहशतवादी नव नवीन पद्धती शोधून काढत असल्यामुळे त्या आव्हानात भरच पडली आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी आता सरकारी सुरक्षा संस्थाही सज्ज झाल्या आहेत. DRDO म्हणजेच Defence Research and Development Organization ने ड्रोन हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन भारतीय लष्करासाठी (Indian Army) खास तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्याचा वापर सीमेवर शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Prime Minister Narendra Modi) सुरक्षेसाठीही ते तैनात करण्यात येणार आहे. याबाबतचं वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिलं आहे.
पाकिस्तान काश्मीर आणि पंजाबमध्ये सीमेवर ड्रोनच्या माध्यमातून शस्त्र पुरवढा करत असल्याचं उघड झालं आहे. असे अनेक ड्रोन्स लष्कराने जप्त आणि नष्टही केले आहेत. त्याचबरोबर मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. शस्त्रांबरोबरच त्यातून ड्रग्जचा पुरवठाही करण्यात येतो.
ही नवीन तंत्रज्ञान प्रणाली ड्रोन्सचे सिग्नल बंद पाडते त्याचबरोबर लेसरने टार्गेट निश्चित करत त्याचा ठावठिकाणाही देऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षे समोरची आव्हान लक्षात घेऊन हे तंत्रज्ञान त्यांच्या सुरक्षेतही तैनात करण्यात आलं आहे. पंतप्रधान जिथे जातील तिथे त्यांच्या ताफ्यात हे ड्रोन किलर राहणार आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा आणखी मजबुत होणार आहे.