भारतीय पक्षीशास्त्राचे जनक डॉ सलीम अली यांची आज जयंती

भारतीय पक्षीशास्त्राचे जनक डॉ सलीम अली यांची आज जयंती

डॉ. सलीम अली यांचा जन्म मुंबईच्या खेतवाडी भागात झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छर्ऱ्याच्या बंदुकीने लहान पक्षी टिपायचे हा त्यांचा छंद होता.

  • Share this:

12 नोव्हेंबर: आज देशातले आद्यपक्षीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. सलीम अली यांचा जन्मदिवस. 12 नोव्हेंबर 1896 रोजी सलीम अली यांचा जन्म झाला होता. पक्षीशास्त्राच्या इतिहासात सलीम अली यांचं मोठं नाव आहे. सलीम अली यांनी ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या या कार्याने भारतात हौशी पक्षीनिरीक्षक बनण्याची परंपरा सुरू झाली. भारतातील हे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरू मानतात.

डॉ. सलीम अली यांचा जन्म मुंबईच्या खेतवाडी भागात झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छर्ऱ्याच्या बंदुकीने लहान पक्षी टिपायचे हा त्यांचा छंद होता.

एक दिवशी टिपलेल्या चिमण्यांमध्ये त्यांना वेगळी चिमणी मिळाली. पण ती वेगळ्या प्रकराची होती. त्यांनी आपल्या मामांच्याकडे चौकशी केली तर मामांनी त्यांना थेट बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत नेलं आणि हीच त्यांच्या पक्षीप्रेमाची सुरुवात ठरली. पुढे १९१८ मध्ये त्यांचा तेहमिना यांच्यांशी विवाह झाला. तेहमिना यांनी सलीम अलींचा पक्ष्यांबद्दलचा कल जाणून घेतला होता व ज्यात त्यांचा छंद जोपासला जाईल अशी नोकरी करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले.

परंतु सलीम अलींचे शिक्षण अशी नोकरी मिळवण्यास एकदम जुजबी होते. जवळच्या ओळखीने त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीमध्ये गाईड लेक्चररची नोकरी मिळाली. परंतु अलींना ते पुरेसं नव्हतं.

त्यावेळी भारतात पक्षीशास्त्र (ऑर्निथोलॉजी ) हा विषय अस्तित्वातच नव्हता. यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षीशास्त्राचं प्रशिक्षण घेतलं व काही काळ इंग्लंडमध्ये काम केलं. त्यांनी पक्ष्यांना केवळ टिपून त्यात भुसा भरून संग्रहालयात ठेवण्यासाठी पक्षीशास्त्र नाही हे जगाला दाखवून दिलं आणि एकूणच पक्षीशास्त्रालाच वेगळी दिशा दिली.

देशाच्या वायव्य सरहद्दीपासून ते केरळच्या जंगलांपर्यंत तसेच कच्छच्या दलदलीपासून पूर्वेकडे सिक्कीम व अरुणाचलपर्यंत जाऊन त्यांनी पक्ष्यांच्या नोंदी केल्या. पक्ष्यांचे वर्तन, त्याच्यांत हवामानानुसार होणारे बदल, स्थलांतराच्या सवयी, विणीचे हंगाम यावर मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली. सुरुवातीला या कामी त्यांची पत्नी तेहमिनाने खूप मदत केली. त्याच सलीम अलींच्या मोहिमांचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट बघत. १९३९ मध्ये तेहमिनांचा मृत्यू झाल्यानंतर अली खूपच दु:खी झाले. त्यांच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु त्यातून सावरून पुन्हा लग्न न करता त्यांनी आपलं आयुष्य पूर्णपणे पक्ष्यांना वाहून देण्याचं ठरवलं.

१९४३मध्ये लिहिलेलं 'द बुक ऑफ इंडियन बर्ड्‌स' हे पुस्तक आजही पक्षी ओळखण्यासाठी पहिल्या पसंतीचं आहे. त्यांच्या पक्षीविषयातल्या कामामुळे सलीम अली यांना भारत सरकारने 1958 मध्ये पद्मभूषण तर 1976 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं.

भारतात पक्षीशास्त्राची मुहुर्तमेढ रोवून अखेर 20 जून 1987 वयाच्या नव्वदीत सलीम अलींनी या जगाचा निरोप घेतला. द फॉल ऑप स्पॅरो या नावानी त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांचे अनेक लेख वर्तमानपत्रातून आणि मासिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2017 09:58 AM IST

ताज्या बातम्या