नवी दिल्ली, 11 मे: ऐन निवडणुकीच्या काळात शीख दंगलीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करुन पक्षास अडचणीत आणणाऱ्या सॅम पित्रोदा यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी झटका दिला आहे. राहुल गांधी यांनी पित्रोदा यांना खडे बोल सुनावले आहे. तसेच निवडणुका होईपर्यंत राजकीय विषयावर बोलू नका, असे आदेश राहुल गांधींनी पित्रोदांना दिले आहेत.
लोकसभा निवडणूक होईपर्यंत पित्रोदा यांनी केवळ आंतरराष्ट्रीय विषयावरच त्यांनी बोलावे असे सांगण्यात आले आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर झालेल्या शीख दंगलप्रकरणी पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मोदी सरकारवर टीका करताना पित्रोदा म्हणाले होते की, तुम्ही गेल्या ५ वर्षात काय केले? 84मध्ये दंगल झाली तर झाली. तुम्ही काय केले असे पित्रोदा म्हणाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यात दिल्ली आणि पंजाबमध्ये मतदान होणार आहे. 84च्या दंगलीत सर्वाधिक हिंसाचार याच भागात झाला होता. त्यामुळे मतदानात पित्रोदा यांच्या विधानाचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो. त्यामुळेच राहुल गांधी यांनी तातडीने पित्रोदा यांना माफी मागण्यास सांगितले. पित्रोदा यांच्या या विधानानंतर पंजाबाचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंद्र सिंग यांच्यासह अन्य नेत्यांनी पित्रोदा यांचा विधानाचा मोठा फटका बसू शकतो असे राहुल गांधींना सांगितले.
शीख दंगल : सॅम पित्रोदांनी माफीनामा दिला पण खापर फोडलं भाषेवर
शीख दंगलीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी माफी मागितली आहे. 'भाषेतील अडचणीमुळे हा गैरसमज झाला. मला हिंदीची जास्त समज नाही,' असं स्पष्टीकरणही पित्रोदा यांनी दिलं आहे.
शीख दंगलीबाबत भाजपकडून करण्यात येत असलेल्या आरोपाबाबत बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले होते की, 'हुआ तो हुआ...गेल्या पाच वर्षांत तुम्ही काय काम केलं ते सांगा.' पित्रोदांच्या या विधानानंतर मोठा गदारोळ झाला. त्यानंतर आता त्यांनी आपला माफीनामा सादर केला आहे.
'मला शीख बांधवांच्या भावना दुखावयाच्या नव्हत्या. पण त्यांना माझ्या वक्तव्याने त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. जे झालं ते फार वाईट झालं,' असं म्हणत सॅम पित्रोदांनी सारवासारव केली आहे.
माफी मागितल्यानंतर पित्रोदांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'जगात भारताला मोदींमुळे नव्हे तर राजीव गांधींमुळेच ओळख मिळाली आहे,' असं सॅम पित्रोदांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पित्रोदांच्या या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. 'देश मर्डरर काँग्रेसला त्यांच्या पापांसाठी कधीच माफ करणार नाही,' असं ट्वीट भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे. त्यानंतर बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसला याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
VIDEO: हेल्मेट न घालणाऱ्या मुंबई पोलिसाची दादागिरी, प्रश्न विचारणाऱ्या तरुणालाच झापलं