12 एप्रिल : विरोधक गदारोळ घालून सातत्यानं संसदेची कोंडी करत असल्याचा निषेध करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील राजघाटावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. पण उपोषणाआधी काहीही खाऊ नका, आणि खाल्लं तरी त्याचे फोटो आणि सेल्फी काढू नका असे आदेश भारतीय जनता पक्षाकडून कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी देण्यात आले आहेत.
काही दिवसांआधीच अॅट्रॉसिटीच्या मुद्यावरुन मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसने एक दिवसाचं उपोषण केलं होतं. मात्र या उपोषणाआधी काँग्रेस नेते छोले भटुरे खात असल्याची छायाचित्रं समोर आली आणि भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला. सोशल मीडियावरही याची जोरदार खिल्ली उडवण्यात आली होती.
त्यामुळे आता काँग्रेससारखी नामुष्की आपल्यावर ओढवू नये, यासाठी भाजपने नेत्यांना खाताना जरा सावधान अशा सुचना दिल्या आहेत. खातानाचे फोटो काढू नका, डायबेटीस असल्यास उपोषणात सहभागी होऊ नका असंही पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
संसदेच्या अधिवेशनाचा वेळ वाया गेल्यानं पंतप्रधान आणि भाजपचे खासदार आज उपोषण करणार आहेत. मात्र काँग्रेसच्या उपोषणाप्रमाणे आपल्याही उपोषणाचा फज्जा उडू नये, यासाठी भाजपचे नेते सावध झाले आहेत.