पटकथा लेखक ते मुख्यमंत्री, करुणानिधींचा जीवनप्रवास

पटकथा लेखक ते मुख्यमंत्री, करुणानिधींचा जीवनप्रवास

करूणानिधी या नावाशिवाय तामिळनाडूचं राजकारण पूर्णच होऊ शकत नाही

  • Share this:

तामिळनाडू, 07 आॅगस्ट : स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाचे राजकारण जवळून पाहिलेला दक्षिणेतला करूणानिधी नामक राजकीय तारा काळाच्या पडद्याआड गेलाय. करूणानिधी या नावाशिवाय तामिळनाडूचं राजकारण पूर्णच होऊ शकत नाही. 78 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी देशाच्या राजकारणातही अनेकदा मुख्य भूमिका बजावली.

मुत्तुवेल करूणानिधि या नावाभोवती गेली सहा दशकं तामिळनाडूचं राजकारण फिरतंय. 60 वर्षांच्या कारकिर्दीत पाच वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रिपद हे त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचं गमक सांगून जातंय. 3 जून 1924 ला जन्मलेले करूणानिधी तमिळ सिनेमा जगतात एक प्रसिद्ध नाटककार आणि पटकथा लेखक म्हणून ख्यातकिर्त होते. कलाईनार अर्थात कलेतला विद्वान या टोपणनावानंही ते तामिळ जनतेत लोकप्रिय होते.

तामिळनाडूमध्ये सामाजिक स्तरावर सुधारणा आंदोलनाची मोठी परंपरा आहे. रामास्वामी पेरियार यांनी जात आणि लिंग आधारित भेदभावाविरोधात सुरू केलेलं  द्रविड आंदोलन प्रसिद्ध आहे. याच द्रविड आंदोलनाशी प्रभावित होऊन करूणानिधी पुढे आले. आपल्या बुद्धी आणि भाषण कौशल्यानं ते लवकरच प्रभावी राजकीय नेते बनले. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासूनच ते तामिळनाडूच्या राजकारणात पाय रोवून आहेत.

1957 साली पहिल्यांदा ते तामिळनाडू विधानसभेवर निवडून गेले. 1969 मध्ये तत्कालीन डीएमके अध्यक्ष आणि तत्कालीन मुख्यमंत्री अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर ते डिएमकेचे प्रमुख बनले आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 1971, 1989, 1996 आणि 2006 असं पाच वेळा ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. 1957 पासून आजतागायत करूणानिधी सलग बारा वेळा विधानसभेवर निवडून आले. केंद्रातल्या यूपीए सरकारमध्येही त्यांच्या पक्षानं महत्त्वाची भूमिका पार पाडली.

भ्रष्टाचाराचे आरोप, प्रभू रामाविषयीचं वादग्रस्त वक्तव्य, दहशतवादी संघटना लिट्टेसोबतच्या संबंधावरून ते अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रकृतीच्या अनेक तक्रारी आणि शारिरीक व्याधींचा सामना करत करूणानिधींनी तामिळनाडूमध्ये आपला पक्ष जोमानं वाढवला. तामिळी जनतेनेही या कलंदर कलावंतावर निरातिशय प्रेम केलं. पण आपल्या कुटुंब कबिल्याच्या मोहापासून स्वत:ला ते दूर ठेवू शकले नाहीत. आता जयललितांपाठोपाठ करूणानिधींसारख्या दिग्गज नेत्याच्या निधनामुळं तमिळ राजकारणात निश्चितपणे पोकळी निर्माण झालीये.

संबंधित बातम्या

झुंज संपली, एम. करूणानिधी यांचं निधन

First published: August 7, 2018, 7:27 PM IST

ताज्या बातम्या