जयपूर, 10 ऑक्टोबर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विशेषज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, नागरिकांना कोरोना काळात यंदा दिवाळी स्व:शिस्त पाळून आणि फटाक्यांचा वापर न करता साजरी करण्याचं सांगितलं आहे. अशोक गहलोत यांनी विशेषज्ञ डॉक्टरांसह कोरोनाचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत विशेषज्ञांनी सांगितलं की, फटाक्यांनी (Firecrackers) होणारा धूर आणि प्रदूषण सर्वसामान्यांसह, कोरोनाग्रस्तांना किंवा कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींसाठीही घातक ठरु शकतो.
राजस्थान राज्य मानवाधिकार आयोगाने फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसंच तज्ञ डॉक्टरांनी कोरोना संसर्ग काळात फटाक्यांचा वापर टाळण्याबाबत इशारा दिला आहे. फटाक्यांच्या धूरामुळे, त्यातून निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे, कोरोना रुग्ण आणि कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीलाही त्रास होऊ शकत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याशिवाय सर्वांच्याच आरोग्याचं रक्षण करण्यासाठी, काळजी घेण्यासाठी स्व:शिस्त बाळगून दिवाळी साजरी करणं, आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, बैठकीत वैद्यकीय आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अखिल अरोरा यांनी, गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येत काही प्रमाणात स्थिरता आल्याचं सांगितलं. तसंच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयूची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. 30 सप्टेंबर रोजी ऑक्सिजन बेड, आयसीयू आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्या 2800हून अधिक होती, ती 8 ऑक्टोबरपर्यंत कमी होऊन 2100वर पोहचली असल्याचंही, त्यांनी सांगितलं.