News18 Lokmat

दिग्विजय सिंह यांच्याविरोधात प्रतिभा अडवाणींना उमेदवारी ?

मध्य प्रदेशमधल्या भोपाळची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची मुलगी प्रतिभा अडवाणींना इथून उमेदवारी दिली जाऊ शकते.

News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2019 04:54 PM IST

दिग्विजय सिंह यांच्याविरोधात प्रतिभा अडवाणींना उमेदवारी ?

भोपाळ, 5 एप्रिल : मध्य प्रदेशमधल्या भोपाळची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. इथे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपकडून कोण लढणार यावर अनेक दिवस चर्चा सुरू आहे. आता भोपाळमधून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची मुलगी प्रतिभा अडवाणींना उमेदवारी दिली जाऊ शकते. लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगरमधून डावलल्यानंतर अडवाणींनी जाहीरपणे आपली मतं मांडायला सुरुवात केली आहे. त्यांना नाराज करू नये यासाठी प्रतिभा अडवाणींना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे.

अडवाणींचा भोपाळसाठी नकार

मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मध्य प्रदेशमधल्या नेत्यांनी लालकृष्ण अडवाणींना भोपाळमधून लढण्याचा प्रस्ताव दिला होता. पण अडवाणींना गांधीनगरमधूनच लढायचं होतं. त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला.

भोपाळ हा भारतीय जनता पक्षाचा दिग्विजयी गड आहे. कारण 1984 नंतर इथे एकदाही काँग्रेसला विजय मिळालेला नाही. आता मात्र या गडाला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसने आपला दमदार उमेदवार उभा केला आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनाच भोपाळच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे या जागेकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

दिग्विजय सिंहांची वाट बिकट

Loading...

मध्य प्रदेशात सलग 10 वर्षं राज्य करणारे दिग्विजय सिंह यांना आता राजधानी काबीज करणं तितकं सोपं राहिलेलं नाही. या मतदारसंघात 19.5 लाख मतदार आहेत. 1994 मध्ये इथून काँग्रेसचे उमेदवार के. एन. प्रधान जिंकले होते. त्यांच्यानंतर ही जागा काँग्रेसने कधीच जिंकलेली नाही.

भाजपसाठी ही जागा सुरक्षित मानली जाते. तरीही अद्याप पक्षाने या जागेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. दिग्विजय सिंह यांनी इथे पूर्ण जोर लावून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांचा संपूर्ण प्रचार कार्यक्रम ठरलेला आहे. भाजपने मात्र उमेदवारच नाही, त्यामुळे प्रचाराला सुरुवात केलेली नाही.

राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपने या जागेवर फार तगडा उमेदवार न देता लो प्रोफाईल नेता दिला तर दिग्विजय सिंह यांना त्याच्याशी टक्कर देणं थोडं अवघड जाईल. कारण त्यांच्याकडे मग काही ठोस मुद्दा नसेल. याउलट जर उमेदवार भाजपचा मोठा नेता असेल तर दिग्विजय यांच्यासाठी लढत थोडी सोपी होईल.

मुस्लीम मतदार महत्त्वाचे

भोपाळमधल्या 19.5 लाख मतदारांपैकी जवळपास 5 लाख मतदार मुस्लीम आहेत. तरीही दर वेळी भाजप ही जागा सहजपणे जिंकून घेतो. कारण हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा भाजपला मिळतो, असं बोललं जातं. आता मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा काँग्रेसलाही मिळू शकतो, जर मुस्लीमांची एकगठ्ठा मतं त्यांच्या पारड्यात पडली तर! तसं झालं, तर दिग्विजय यांचा विजय सोपा होईल.

भाजपसाठी धोक्याची घंटा

विद्यमान खासदार आलोक संजर यांना भोपाळमधून 2014 च्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते. पावणेचार लाख मतांनी ते जिंकून आले होते. या लोकसभा मतदारसंघात 8 विधानसभेच्या जागा येतात. 2018 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली एकूण मतं काँग्रेसपेक्षा फक्त 63000 नी जास्त होती. ही भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2019 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...