मुंबई 22 मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या लेटर बॉम्बनं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला कात्रीत धरलं आहे. अशात आता मध्य प्रदेशमधील काँग्रेस आमदार आणि वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांचे भाऊ लक्ष्मण सिंह यांनीदेखील याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील आरोप खरे असल्यास काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून घ्यायला हवं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
लक्ष्मण सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं, की महाराष्ट्राचे गृहमंत्री मुंबई पोलिसांकडून जर 100 कोटी रुपये प्रतिमहिना याप्रमाणं वसूल करत असतील आणि जर हे सत्य असेल तर देशमुख देशाचे मुख होऊ शकत नाहीत. असं दिसत आहे, की आघाडी सरकार पिछाडीवर जात आहे. काँग्रेसनं आपलं समर्थन माघारी घ्यायला हवं.
अनिल देशमुखांवर सर्वच स्तरांमधून टीका होत असतानाच त्यांना दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं, की महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख बदलले जाणार नाहीत. त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नतच उपस्थित होत नाही. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक पार पडली. यात काँग्रेसच्यावतीनं कमलनाथ सहभागी झाले होते. या बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले, की गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही. जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. ते म्हणाले, या प्रकरणी कसून चौकशी केली जाईल. कोणीही अधिकारी कितीही मोठा असला तरी चौकशी होणारच. मात्र, सध्या देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh