भारतीय रेल्वे 'कात' टाकणार! 'धुरांच्या रेषा' इतिहासजमा होणार!

भारतीय रेल्वे 'कात' टाकणार! 'धुरांच्या रेषा' इतिहासजमा होणार!

भारतीय रेल्वेनं कात टाकण्याचा निर्णय घेतला असून 2024 पर्यंत कार्बन उत्सर्जनाला लगाम लावण्यासाठी सरकारनं एक महत्वाचं पाऊल उचललंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जानेवारी: रेल्वे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती धुरांची रेषा. पण धुरांची ही रेषा आता इतिहासजमा होणार आहे. भारतीय रेल्वेनं कात टाकण्याचा निर्णय घेतला असून 2024 पर्यंत कार्बन उत्सर्जनाला लगाम लावण्यासाठी सरकारनं एक महत्वाचं पाऊल उचललंय. 2024 पर्यंत देशातील सर्व डिझेल इंजिनं इतिहासजमा होणार आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या संदर्भातली घोषणा करताना 2024 पर्यंत भारतीय रेल्वे विजेवर चालवल्या जातील असं स्पष्ट केलंय.

देशातील कानाकोपऱ्यात पसरलेल्या रेल्वेचं जाळं डिझेल इंजिनमुक्त करण्याच्या दृष्टीनं सरकार पावलं उचलतंय. रेल्वेचं अत्यंत वेगानं विद्युतीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. पुढच्या पाच वर्षात विद्युतीकरणाचं काम पूर्ण होईल आणि सर्व रेल्वे विजेवर धावू लागतील असा विश्वास रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केला.

20130 पर्यंत कार्बन उत्सर्जनमुक्तीचं भारताचं लक्ष

भारतीय रेल्वेनं 2030 पर्यंत विद्युतीकरणाचं काम पूर्ण केल्यास भारत जगातला एकमेव असा देश असेल ज्या देशाची संपूर्ण रेल्वेसेवा विजेवर चालणारी असेल. स्वच्छ ऊर्जेवर चालणाऱ्या रेल्वेमुळे देशात होणाऱ्या प्रदूषणात मोठी घट होईल. या प्रकल्पात ब्राझील या देशानंही सहभागी व्हावं यासाठी भारत उत्सुक आहे. ब्राझीलनेही यासाठी सकारात्मक पावलं उचलली तर या कामाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.

रेल्वेकडून सौर ऊर्जेचं उत्पादन

रेल्वेला सध्या मोठ्या प्रमाणात विजेची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आणि कार्बनमुक्तीच्या दिशेनं जाण्यासाठी रेल्वेकडून सौर ऊर्जेचं उत्पादनही घेतलं जातंय. शिवाय कोळशावर चालणारे जुने संयंत्र टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचं कामही सरकारकडून सुरु आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यात मोठी मदत मिळणार. हवामान बदलामुळे होणारे अनेक परिणाम सध्या आपल्याला सहन करावे लागताहेत. यावर वेळीच उपाय शोधला नाही तर भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करताहेत. या पार्श्वभूमीवर सरकारनं उचललेलं हे पाऊल अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.

------------------

अन्य बातम्या

घर खरेदी करताय? अर्थसंकल्पापर्यंत थांबा, होऊ शकते मोठी बचत

Valentine Day ला पुण्यात निघणार 'Love' परेड, राजकीय नेता घेणार सहभाग

फोटो खरा आहे बरं का! पाहा रात्रीच्या अंधारात कसा दिसतो भारत

First published: January 27, 2020, 5:43 PM IST

ताज्या बातम्या