भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर? काँग्रेसचे आमदार कामत म्हणतात...

भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर? काँग्रेसचे आमदार कामत म्हणतात...

दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यासाठी ते दिल्लीवरून गोव्याकडे निघाले आहेत, अशी चर्चा रंगली होती.

  • Share this:

पणजी, 18 मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. पण कामत यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावलं आहे. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोवा सरकार बहुमतात आहे, हे सिद्ध करण्यासााठी दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यासाठी ते दिल्लीवरून गोव्याकडे निघाले आहेत, अशी चर्चा रंगली होती. यावर आता दिगंबर कामत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'माझा दिल्लीचा दौरा दोन दिवसांपूर्वीच ठरला होता. त्यामुळे कोणालाही भेटण्याचा प्रश्नच येत नाही. मला भाजपकडून कोणतीही ऑफर नाही आणि मी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही,' असं काँग्रेस आमदार कामत यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्यातील भाजप सरकारसमोर पुन्हा एकदा राज्यातील सत्ता टिकवून ठेवण्याचं राजकीय संकट उभं राहिलं आहे. पर्रीकरांच्या जागेवर नवीन नेता निवडण्याचं आव्हान भाजसमोर निर्माण झालं आहे. कारण काँग्रेस पक्षानं राज्यपालांना पत्राद्वारे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. राज्यातील ही घडामोड पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी (17 मार्च)रात्री गोव्यात दाखल झाले असून भाजप नेत्यांसोबत त्यांच्या रात्रभर बैठका घेत आहेत.

नितीन गडकरी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे नेते सुदिन ढवळीकर यांची रात्रभर बैठक सुरू होती. ढवळीकर यांनी सांगितले की, आपल्या पक्षासोबत बैठक केल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल, याबाबतची माहिती सांगेन. दरम्यान, गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार असून, त्यात गोवा फॉरवर्ड पक्ष, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे.

गोव्यातील संख्याबळ

एकूण जागा : 40

सध्याचे संख्याबळ - 36

भाजप : 12

मगोप - 3

गोवा फॉरवर्ड - 3

अपक्ष - 3

काँग्रेस आघाडी

काँग्रेस : 14

राष्ट्रवादी काँग्रेस- 1

मनोहर पर्रीकर यांचं निधन

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं रविवारी (17 मार्च) निधन झाले. गेली काही महिने गोव्यातच निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 63 वर्षांचे होते. प्रकृती ठीक नसतानाही ते मुख्यमंत्री कार्यालयात कामकाज बघत होते. मात्र काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली. रविवारी त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना श्वास घेण्यासही अडचण होत होती. शेवटी त्यांची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून पर्रीकरांच्या निधनाची बातमी देत दु:ख व्यक्त केलं. पर्रीकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबईतल्या लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सुरुवातीला उपचार झाले. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्येही त्यांच्यावर काही महिने उपचार झाले. नंतर पर्रीकरांना अमेरिकेतून सुट्टी देण्यात आली होती. अमेरिकेतल्या उपचारानंतरही त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. अशा परिस्थितीतही लढवय्या पर्रीकरांनी गोव्याचं कामकाज पाहिलं. एवढंच नाही तर काही आठवड्यांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्पही विधानसभेत त्यांनी सादर केला होता.

अतिशय प्रमाणिक, साधी राहणी आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले पर्रीकर हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते. 2014 च्या निवडणुका झाल्यानंतर मोदींनी त्यांना खास दिल्लीत बोलावून घेतलं होतं. मात्र गोव्याच्या निसर्गात रमणारे पर्रीकर दिल्लीत फारसे रमलेच नाहीत. त्यांनी गोव्यात परत येण्याचा निर्णय घेतला आणि ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले.

पर्रीकर आजारी असताना राज्यात अनेकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली. अशा अवस्थेत पर्रीकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधीपक्षांकडून होत राहिली. त्यावरून भाजपवर जोरदार टीकाही झाली होती. मात्र पर्रीकरांनी त्या आरोपांना कधीच उत्तर दिलं नाही.

18 मार्च सकाळी 9.30 ते 10.30 वाजेदरम्यान - मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप प्रदेश कार्यालयात ठेवलं जाणार आहे.

सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत : जनतेसाठी अंत्यदर्शन

दुपारी 4 वाजता : SAG मैदान कंपाल इथपर्यंत अंत्ययात्रा

4.30 वाजता : SAG मैदान इथंच मनोहर पर्रीकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

संध्याकाळी 5 वाजता : पर्रीकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार


VIDEO: शरद पवारांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंची मोदींवर चौफेर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2019 08:23 AM IST

ताज्या बातम्या