हिमाचल प्रदेश, 28 नोव्हेंबर : माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) हे जगातील सर्वांत उंच हिमशिखर आहे. पण गेल्या काही दशकांमध्ये भूकंप आणि इतर नैसर्गिक घटनांमुळे त्याची उंची कमी झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे चीन आणि नेपाळ पुन्हा एकदा या शिखराची उंची मोजणार आहेत. त्यातून उंचीबद्दलचं सत्य जगासमोर येईल.
कशी चर्चा सुरू झाली
चीनचे (China) गृहमंत्री नेपाळमध्ये येतील आणि त्यानंतर दोन्ही देश एव्हरेस्टची उंची मोजण्यासंबंधी चर्चा करतील अशा बातम्या गुरुवारी नेपाळी माध्यमांनी दिल्या होत्या. 2015 मध्ये झालेल्या भूकंपामुळे व इतर नैसर्गिक घटनांमुळे एव्हरेस्टची उंची कमी झाली असल्याने ती पुन्हा मोजली पाहिजे अशी भूमिका नेपाळ सरकारने मांडल्यानंतर ही चर्चा सुरू झाली.
आताची उंची किती आहे?
सर्व्हे ऑफ इंडियाने 1954 मध्ये उंची मोजून ती 8848 मीटर असल्याचं सांगितलं होतं. चिनी सर्व्हेअरने 1975 मध्ये उंची मोजून 8848.13 मीटर असल्याचं सांगितलं.
किती उंची लक्षात आली?
तिबेटमार्गे एव्हरेस्टवर जाऊन चीनच्या एका अधिकृत दलाने ही उंची 8844.43 असल्याचं सांगितलं होतं. ही आधी सांगितलेल्या उंचीपेक्षा 4 मीटर कमी आली त्यामुळे चीननी आरोप केला की नेपाळनी उंची नीट मोजली नाही. नेपाळी मंत्र्यांच्या बैठकीत पुन्हा एव्हरेस्टची उंची मोजण्याचा निर्णय झाला पण ती कधी जाहीर होणार हे ठरलेलं नाही.
दोन्ही देश एकत्रित घोषणा करतील
एव्हरेस्टवर जाण्यासाठी तिबेट आणि नेपाळमधून वाटा आहेत. तिबेट आपला असल्याचा दावा चीन करत आला आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे अधिकारी उंची मोजतील आणि एकत्रितपणे एव्हरेस्टची उंची किती आहे हे जाहीर करतील.
उंची कमी झाली तर चिंता काय?
भूगर्भातील हालचालींमुळे हिमालय पर्वतरांगांवर ताण येत असून त्या वर उचलल्या जात आहेत असं शास्रज्ञांचं मत आहे. भारतीय उपखंड दरवर्षी सरासरी 3 सेंटिमीटर उत्तरेला सरकत आहे त्याचा दाब हिमालयावर पडतोय. त्यामुळेच या भागात मोठे भूकंप होत आहेत. त्यामुळे एव्हरेस्टची उंची कमी झाली तर मानवजातीचीच चिंता वाढेल. सध्यातरी उंचीबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहे आणि कयास लावले जात आहेत. पण प्रत्यक्ष उंची मोजल्यावरच सत्य स्पष्ट होईल आणि 2015 च्या नेपाळमधील भूकंपाचा काय परिणाम झालाय हे स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.