नवी दिल्ली, 30 डिसेंबर : Coronavirus च्या साथीने जग व्यापायला सुरुवात झाली तेव्हाच भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आणले. तेव्हापासून विस्कळीत झालेली विमान सेवा अद्यापही सुरळीत झालेली नाही. आता कोरोनाव्हायरच्या नव्या अवताराच्या (New coronavirus strain) दहशतीमुळे आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध किमान पुढचा महिनाभर कायम राहणार आहेत.
ब्रिटनमध्ये (new coronavirus strain UK)कोरोनाव्हायरसचा नवा प्रकार (Mutation in coronavirus) सापडल्याने जगभर खळबळ उडाली. या नव्या कोरोनाचा संसर्ग भारतात पोहोचू नये म्हणून सरकारने यापूर्वीच ब्रिटनहून येणाऱ्या सर्व फ्लाइट्सवर बंदी घातली आहे. सुरुवातीला 31 डिसेंबरपर्यंत असलेली ही बंदी आता 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यातच ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी काही प्रवाशांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आणि एवढंच नव्हे तर त्यातल्या काहींमध्ये नव्या कोरोनाचा संसर्ग आढळल्याने देशभरात पुन्हा एकदा या विषाणूने दहशत निर्माण केली आहे. देशात नव्या स्ट्रेनचे काही रुग्ण सापडल्यानं केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत ब्रिटनमधून भारतात परतलेल्या प्रवाशांपैकी 20 जणांमध्ये या नव्या कोरोनाचा संसर्ग आढळल्याचं स्पष्ट झालं आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की- 'ब्रिटनमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने निर्णय घेतला आहे की 7 जानेवारी 2021 रोजी रात्री 11:59 पर्यंत ब्रिटनहून भारतात येणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली जातील. 22 डिसेंबरपासून ब्रिटनहून भारतात येणारी विमानं 7 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.'
Govt of India extends suspension of scheduled commercial international flights till Jan 31, 2021; restrictions not to apply on special flights and international air cargo operations. #COVID19 pic.twitter.com/7tD5kl3tfZ
— ANI (@ANI) December 30, 2020
याशिवाय अन्य आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर असलेली बंधनं 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवण्यात आली आहेत. यातून फक्त मालवाहतूक करणारी विमानं (Cargo) आणि DGCA ने (नागरी विमान संचालनालय) परवानगी दिलेली प्रवासी विमानं वगळण्यात आली आहेत. अन्य कमर्शिअल विमान वाहतुकीला जानेवारीअखेरपर्यंत मान्यता नाही.