उपसभापतींची अशीही गांधीगिरी, निलंबित खासदारांसाठी आणला चहा, पाहा हा VIDEO

उपसभापतींची अशीही गांधीगिरी, निलंबित खासदारांसाठी आणला चहा, पाहा हा VIDEO

सभापतींच्या या कारवाईच्या निषेधार्थ सर्व खासदारांनी संसद भवनाच्या आवारात गांधी पुतळ्याजवळ ठिय्या मांडला.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : राज्यसभेत कृषी विधेयक सादर करताना गोंधळ घातला म्हणून 8 खासदारांना निलंबित करण्यात आले. काँग्रेसच्या 8 ही खासदारांनी गांधीगिरी करत रात्रभर संसद भवनात ठिय्या मांडला. त्यांच्या या गांधीगिरीला खुद्द उपसभापती  हरिवंश नारायण सिंह यांनी सकाळी चहा आणला होता.

राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी  उपसभापती  हरिवंश नारायण सिंह यांच्यासमोर असलेला माइक तोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सभापती व्यंकय्या नायडू यांनी  8 ही खासदारांना सात दिवसांसाठी निलंबित केले.

सभापतींच्या या कारवाईच्या निषेधार्थ सर्व खासदारांनी संसद भवनाच्या आवारात गांधी पुतळ्याजवळ ठिय्या मांडला. रात्रभर सर्व खासदारांनी ठिय्या काही सोडला नाही. अखेर सकाळी खुद्द उपसभापतीच या आठही खासदारांना चहा घेऊन आले होते.

हरिवंश सिंह यांनी चहा आणल्यामुळे काँग्रेस खासदार रिपून बोरा यांनी आश्चर्य व्यक्त करत प्रतिक्रिया दिली. हरिवंश यांनी आमच्यासाठी चहा आणून ते आमच्यासोबत एका सहकाऱ्याप्रमाणेच वागले आहे. त्यामुळेच आता संसदेत यावर चर्चा करून आमचे निलंबन मागे घ्यावे, असं रिपून बोरा म्हणाले.

संसदेच्या परिसरात राज्यसभा सदस्य राजीव  सातव यांच्यासह काँग्रेसचे तीन, डाव्या पक्षाचे दोन, तृणमूल काँग्रेसचे दोन आणि आम आदमी पक्षाचे एक खासदार रात्रभर अशा आठ खासदारांनी संसद परिसरात ठिय्या मांडला. यात  डेरेक ओब्रायन, दोला सेन (तृणमूल), राजीव सातव, रिपून बोरा, सईद नासीर हुसेन (काँग्रेस), संजय सिंह (आप), के.के. रागेश, इल्लामारम करीम (CPI-M) यांचा समावेश आहे.

आज पहाटेचे खुद्द राजीव सातव यांनी ट्वीट करून आंदोलनाचा फोटो शेअर केला. सर्व खासदार अजूनही आंदोलन करत असल्याचे पहायला मिळत आहे. या सर्व खासदारांनी संसदेच्या परिसरात रात्र काढली.

ही कारवाई म्हणजे, मुस्कटदाबी असल्याची टीका या खासदारांनी केला. सरकार आवज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही या खासदारांनी केला आहे.

काय होतोय विधेयकाला विरोध?

या विधेयकाला देशभरातून मोठा विरोध होण्याचं मुख्य कारण म्हणजे, हा नवीन कायदा लागू झाल्यास कृषी क्षेत्र भांडवलदारांच्या हातात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार, हमीभावाती पद्धत देखील संपुष्टात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नसल्याची भीती देखील  व्यक्त केली जात आहे.

त्याचबरोबर कमिशन एजंटचं कमिशन बुडणार असल्याची भीती एजंटांनी व्यक्त केली आहे. पंजाबमध्ये जवळपास 12 लाख शेतकरी कुटुंब असून सर्वांनाच याचा फटका बसणार आहे. नव्या कृषी विधेयकाविरोधात प्रामुख्याने तीन राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्यात पंजाबचा समावेश आहे.

Published by: sachin Salve
First published: September 22, 2020, 9:40 AM IST
Tags:

ताज्या बातम्या