नवी दिल्ली, 9 डिसेंबर : भारतात गुळाला (Jaggery) मोठी मागणी असते. परंतु आता जगभरातूनदेखील गुळाची मागणी वाढत आहे. गूळ आता इंटरनॅशनल मिठाईच (Sweet) बनला आहे. एक्सपोर्ट (Export) ॲथॉरिटीच्या आकडेवारीतून हेच समोर येत असून, भारतातून जगभरातील 200 देशांमध्ये गुळाची निर्यात होते आहे. परदेशातील नागरिक दरवर्षी लाखो टन गुळाचे सेवन करतात. अमेरिका, फ्रान्स, इराण, यूके, सिंगापूर आणि कुवेत या देशांमध्येही गुळाला मोठी मागणी आहे. सर्व देशांच्या तुलनेत, श्रीलंकेत सर्वाधिक भारतीय गुळाचं सेवन करण्यात येतं.
दरवर्षी वाढते गुळाची निर्यात -
गुळाचे सर्वांत जास्त उत्पादन हे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात होतं. अनेक गुऱ्हाळे गावांमध्ये तयार करण्यात येतात. मागणी वाढल्यामुळे गुऱ्हाळांची संख्या देखील वाढत आहे. जगभरातून गुळाची मागणी वाढत असल्याने उत्पादन देखील वाढत आहे. सर्वात मोठी गुळाची बाजारपेठ असलेल्या उत्तर प्रदेशातील शामलीमधील व्यापारी संजय मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गूळ खरेदीदारांमध्ये दरवर्षी नवनव्या देशांची भर पडत आहे.
एक्सपोर्ट ॲथॉरिटीने दिलेल्या (Export) माहितीनुसार, 2017 मध्ये 2.52 मेट्रिक टन गुळाची निर्यात झाली होती. तर 2018 मध्ये 3.13 आणि 2019 मध्ये 3.41 मेट्रिक टन गुळाची निर्यात करण्यात आली होती. 2020 च्या एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान 3 लाख मेट्रिक टन गुळाची निर्यात झाली आहे. मागील तीन वर्षातील आकडेवारीनुसार, श्रीलंकेत 7.84 टक्के गुळाची निर्यात झाली. तर नायजेरियामध्ये 7.18, नेपाळमध्ये 6.02, मलेशियामध्ये 5.72 टक्के आणि टांझानियामध्ये 5 टक्के गुळाची निर्यात करण्यात आली आहे.
चीनमध्ये 6 महिन्यात 2404 मेट्रिक टन गुळाची निर्यात -
एक्सपोर्ट ॲथॉरिटीच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात ज्यावेळी भारतात लॉकडाउन होतं, त्यावेळी भारतातून चीनमध्ये मोठ्या प्रमाणात गुळाची निर्यात करण्यात आली होती. या कालावधीत गुजरातमधून सर्वाधिक 1583 मेट्रिक टन गुळाची निर्यात करण्यात आली. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून महाराष्ट्रातून 819.46 मेट्रिक टन, तर तेलंगणामधून 2 मेट्रिक टन गुळाची चीनला निर्यात करण्यात आली. यामुळे केवळ 6 महिन्यात 2404 मेट्रिक टन गूळ चीनने खरेदी केला. याचे एकूण निर्यातमूल्य 9.22 लाख अमेरिकन डॉलर इतकं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.