दिल्ली हिंसाचारावरून अवघड प्रश्न विचारताच उठून गेले प्रकाश जावडेकर

दिल्ली हिंसाचारावरून अवघड प्रश्न विचारताच उठून गेले प्रकाश जावडेकर

'परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचं काम महत्त्वाचं आहे. ते काम सगळ्यांनीच केलं पाहिजे. असं असताना काँग्रेसने राजकारण सुरु केलंय.'

  • Share this:

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : दिल्लीतल्या हिंसाचारावरून आता राजकारणाला सुरुवात झालीय. काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपला जबाबदार धरले. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळेच हिंसाचार भडकला असा आरोप सोनिया गांधी यांनी केला होता. काँग्रेसच्या या आरोपांना भाजपकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिलं. परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचं काम महत्त्वाचं आहे. ते काम सगळ्यांनीच केलं पाहिजे. असं असताना काँग्रेसने राजकारण सुरु केलंय असा आरोप भाजपने केला. 1984च्या दंगलीत ज्यांचे हात रक्ताने माखले अशा लोकांनी आरोप करू नये असं जावडेकरांनी म्हटलंय.

अमित शहा हे गेली दोन दिवस दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून असून सतत बैठका घेत असल्याचंही प्रकाश जावडेकरांनी सांगितलं.

या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी जावडेकरांवर प्रश्नांची सरबत्ती केली. कपील मिश्रा आणि इतर भाजप नेत्यांनी केलेली चिथावणीखोर वक्तव्य, पोलिसांची भूमिका असे अनेक प्रश्न जेव्हा प्रकाश जावडेकरांना पत्रकार विचारू लागले. त्याला उत्तर न देताच जावडेकरांनी पत्रकार परिषदच गुंडाळली आणि ते निघून गेले.

पंतप्रधानांनी सोडलं मौन

राजधानी दिल्लीतल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी हिंसाचारावर तीव्र चिंता व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलंय. शांतता आणि सौहार्द हा आमच्या मुलभूत धोरणांचा भाग आहे. दिल्लीच्या बंधू आणि भगिनींनी शांतता राखावी असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. परिस्थिती पूर्वपदावर येणं याला सर्वोच्च प्राधान्य सरकार देत आहे असंही ते म्हणाले. दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या आधी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.

सोनिया गांधींचा भाजपवर हल्लाबोल

दिल्लीतल्या हिंसाचार हा सुनियोजित कट असून भाजपच त्याला जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. काँग्रेसच्या कार्यसमितीची आज बैठक झाली आणि त्यात दिल्लीतल्या हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर हा मोठा हल्ला केला. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत हिंसाचार भडकलेला असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते असा सवालही त्यांनी केला.

First published: February 26, 2020, 3:16 PM IST

ताज्या बातम्या