दिल्ली अजूनही अशांत; दंगेखोरांना दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश; हिंसाचारात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू

दिल्ली अजूनही अशांत; दंगेखोरांना दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश; हिंसाचारात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू

दिल्लीमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. हिंसाचारावेळी महिला पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली असून फोटो आणि व्हिडिओ डिलिट करायला लावले.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : दिल्लीमध्ये CAA आणि NRC विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. सलग दुसऱ्या दिवशी हिसांचार सुरुच आहे. दोन गटांमध्ये दगडफेकसुद्धा झाली. त्यानंतर दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरासाठी जमावबंदी लागू केली आहे. ईशान्य दिल्लीत भडकलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे.

मौजपूर, जाफराबाद भागामध्ये अद्याप तणावाचे वातावरण आहे. या परिसरात बऱ्याच प्रमाणात नासधूस करण्यात आली आहे. पत्रकारांवरही हल्ला करण्यात आला. तसंच पत्रकारांनी काढलेले फोटो आणि व्हिडिओ डिलिट करायला लावल्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे. दगडफेक आणि दंगलींमध्ये जखमी असणाऱ्यांना गुरु तेगबहादूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आतापर्यंत इथे 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

ईशान्य दिल्लीतल्या शाळांमध्ये 26 फेब्रुवारीला होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. CBSE ने शिक्षण संचालनालयाकडून आलेल्या विनंतीवरून परीक्षा पुढे ढकलली आहे. दिल्लीच्या 4 भागांमध्ये जमावबंदीचे आदेश आहेत. दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेशही (Shoot At Site) दिल्याचं रात्री उशीरा स्पष्ट झालं.

दिल्लीत दुपारच्या सुमारास दगडफेकही झाली. यावेळी जमावाने दोन पत्रकारांसोबत धक्काबुक्की केली. यात CNN News18 च्या एका महिला पत्रकाराचा समावेश आहे. यात जखमी झालेल्या महिला पत्रकारावर सध्या उपचार सुरू आहेत.

आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जाळपोळीच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या असून आग नियंत्रणासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या बंबावरही दगडफेक झाली.

जाफराबाद आणि मौजपूर भागात हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी माध्यमांना माहिती दिली. केजरीवाल म्हणाले की, गृहमंत्र्यांसोबत झालेली बैठक सकारात्मक होती आणि केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

केजरीवाल म्हणाले की, या हिंसाचाराने कोणाचाही फायदा होणार नाही. सर्व पक्षांनी राजकारणापलिकडं या घटनेकडं बघायला हवं. हा दिल्लीचा प्रश्न आहे आणि सर्व पक्ष मिळून दिल्ली पुन्हा पुर्ववत करण्याचा प्रयत्न करू.

गोळीबार, जाळपोळ; दिल्ली हिंसाचाराचे 16 भीषण PHOTOS

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2020 06:30 PM IST

ताज्या बातम्या