LIVE: दिल्ली हिंसाचारानं आतापर्यंत घेतला 27 जणांचा जीव, पोलिसांचं अटकसत्र सुरू

LIVE: दिल्ली हिंसाचारानं आतापर्यंत घेतला 27 जणांचा जीव, पोलिसांचं अटकसत्र सुरू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने सांगितले की हिंसाचारग्रस्त भागात दिल्ली पोलिसांना आवश्यक प्रमाणात निमलष्करी दलांची सुरक्षा पुरविली गेली आहे.

  • Share this:

'नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : ईशान्य दिल्लीत गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या  हिंसाचारात आतापर्यंत 23 जणांचा बळी गेला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (CAA) विरोधात सुरू असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आणि दिल्लीचा काही भाग पेटला. अजूनही अनेक भागात तणावाचं वातावरण आहे. दगडफेक, जाळपोळ, हिंसाचार सुरू आहे.  23 जण मृत्युमुखी पडले आहेत तर 56 पोलिसांसह 200 जण जखमी असल्याची माहिती आहे. विविध रुग्णालयांशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. गेल्या दोन दिवसांत 120 हून अधिक लोकांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्वाधिक जखमी गुरु तेगबहादूर (GTB) रुग्णालयात भरती आहेत.

हिंसाचारातल्या बळींची संख्या वाढत असल्यावर चिंता व्यक्त करताना दिल्ली हायकोर्टाने या परिस्थितीबाबत निरीक्षण नोंदवलं आहे आणि कडक शब्दांत टिप्पणी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या उच्चपदस्थ नेत्यांनी पीडितांच्या आणि नातेवाईकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या पाहिजेत. सर्वसामान्य नागरिकांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याची वेळ आता आली आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. 1984 च्या दंगलीची आठवण काढत पुन्हा दिल्लीत असं होऊ देणार नाही, असंही या सुनावणीच्या वेळी कोर्टाने म्हटलं.

एकीकडे तणावपूर्ण वातावरण असताना दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारग्रस्त भागात सैन्य तैनात करण्याच्या मागणीवर गृह मंत्रालयाने 'सध्या सैन्य तैनात करण्याची गरज नाही' असं म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने सांगितले की हिंसाचारग्रस्त भागात दिल्ली पोलिसांना आवश्यक प्रमाणात निमलष्करी दलांची सुरक्षा पुरविली गेली आहे.

संबंधित - दिल्लीतल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी भजनपुरा आणि खुरेजी खास भागात ध्वज मोर्चा काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीलमपूरमध्ये आता परिस्थिती सुधारत आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेपासून हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही. त्याचबरोबर पोलिसांनी बाबारपूर, जाफराबाद आणि गोकुळपुरी येथे वाहतूक बंद केली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) तणावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी रात्री हिंसाचारग्रस्त भागात दाखल झाले. त्यांनी कारमध्ये बसून सीलमपूर, भजनपुरा, मौजपूर, यमुना विहार यासारख्या हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर पोलीस आयुक्तांसह सीपी, डीसीपी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली.

24 तासांच्या आत शाह यांची तिसरी बैठक

गृहस्थ मंत्रालयाने परिस्थिती लक्षात घेता प्रभावित भागात दिल्ली पोलिसांसह सीमा सशस्त्र बल (SSB) आणि इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP) चे जवान तैनात केले आहेत. वेगाने अॅक्शन घेणारे सैनिकसुद्धा प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या 24 तासांत तिसरी प्रमुख बैठक घेतली आहे. या बैठकीत नवनियुक्त दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) एस एन श्रीवास्तवही उपस्थित होते. ही बैठक सुमारे 3 तास चालली.

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

जवाहरलाल नेहरू स्टूडंट्स युनियन (JNUSU) चे विद्यार्थी आणि नागरी हक्क समूहाचे लोकांनी दिल्लेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर धरणावर बसले आहेत. त्यांची मागणी आहे की दिल्लीतील हिंसाचाराबाबत बैठक आयोजित केली जावी.

दंगेखोरांना पाहताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

ईशान्य दिल्लीत पोलिसांनी दंगेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित - ‘फोटो काढू नका, फक्त हिंसाचाराची मजा घ्या’, पत्रकाराने सांगितला दिल्लीचा अनुभव

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) यावर ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसक निदर्शनात 56 पोलीस जखमी झाले.

संबंधित - रविवारपासून अमित शहा कुठे होते? दिल्लीतल्या हिंसाचारावरून सोनियांचा हल्लाबोल

हिंसाचारात प्राण गमावलेल्यांमध्ये दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा समावेश आहे. परिस्थिती लक्षात घेता मौजपूर, झफराबाद, चांदबाग आणि करावलनगरमधील हिंसाचारग्रस्त चार भागात कलम 144 लागू करण्यात आला आहे.

एसएन श्रीवास्तव आहेत स्पेशल कमिशनर

गृह मंत्रालयाने आयपीएस एसएन श्रीवास्तव यांना तातडीने प्रभावीपणे दिल्ली पोलिसात विशेष आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून नियुक्त केले आहे. सध्या ते सीआरपीएफमध्ये एडीजी पदावर कार्यरत आहेत. सीआरपीएफमध्ये पोस्ट करण्यापूर्वी ते दिल्ली पोलिसात अनेक महत्त्वाच्या पदांवर तैनात आहेत.

ईशान्य दिल्लीमध्ये सगळ्या शाळा बंद, बोर्डाच्या परीक्षाही रद्द

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, हिंसाग्रस्त उत्तर पूर्व दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बुधवारी बंद राहतील. बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सिसोदिया यांनी सीबीएसईला बुधवारी होणारी बोर्ड परीक्षा तहकूब करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सीबीएसईने बुधवारी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

First published: February 26, 2020, 7:05 AM IST

ताज्या बातम्या