दिल्ली हिंसाचार: 2 SIT करणार चौकशी, 48 वर पोहोचला मृतांचा आकडा

दिल्ली हिंसाचार: 2 SIT करणार चौकशी, 48 वर पोहोचला मृतांचा आकडा

दिल्ली हिंसाचार प्रकरणातील मृतांचा आकडा आता 48 वर पोहोचला आहे.

  • Share this:

आनंद तिवारी,(प्रतिनिधी)

नवी दिल्ली,27 फेब्रुवारी: दिल्ली हिंसाचार प्रकरणातील मृतांचा आकडा आता 48 वर पोहोचला आहे. हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून आतापर्यंत 106 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ही हिंसा झाल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. दिल्लीत दंगल भडकवल्याप्रकरणी 48 FIR दाखल करण्यात आले आहेत. या हिंसाचारात 56 पोलिसांसह 200 जण जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींवर दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिल्ली हिंसाचार प्रकरणाचा चौकशी आता विशेष तपास पथकाच्या (SIT) माध्यमातून करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चने चौकशी करण्यासाठी दोन एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटीच्या एका पथकाचे नेतृत्त्व डीसीपी जॉय तिर्की तर दुसऱ्या पथकाचे नेतृत्त्व हेड डीसीपी राजेश देव करणार आहेत. दोन्ही पथकात चार-चार असे एकूण आठ एसीपी असतील. याशिवाय तीन-तीन इन्स्पेक्टर, चार-चार सब-इन्स्पेक्टर आणि पोलिस कॉन्स्टेबल असतील. दोन्ही एसआयटीवर एडिशनल सीपी, क्राइम बी.के सिंह यांचे लक्ष राहणार आहे. उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणी आतापर्यंत 48 FIR कॉपी दिल्ली पोलिसांनी एसआयटीकडे सुपूर्द केल्या आहेत.

दिल्ली पोलिसांचे प्रवक्ता एमएस रंधावा यांनी सांगितले की, हिंसाचाराचे सुमारे एक हजार सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. ते तपासण्याचे काम सुरू आहे. सध्या उत्तर-पूर्व दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. जनजीवनही पूर्वपदावर येत आहे.

दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्ली हिंसाचार प्रकरणी सरकारला सवाल केले आहेत. संजय राऊत यांनी ट्वीट करून देशात एक मजबूत सरकार आहे, मजबूत पंतप्रधान आहेत. तीन दिवस दिल्ली पेटत होती. असे का झाले, कसे झाले, यावर संसदेच्या आगामी सत्रात चर्चा होईल आणि ती झालीच पाहिजे, असे म्हटले आहे.

दरम्यान, सोमवारी उत्तर-पूर्व दिल्लीतील अनेक भागात नागरिकत्त्व सुधारित कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ आणि विरोधात आंदोलक रस्त्यावर उतरले होते. अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आतापर्यंत या हिंसाचाराने 48 जणांचा बळी घेतला आहे तर 200 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये हेड कॉन्स्टेबल आणि आयबीच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

First published: February 27, 2020, 8:13 PM IST

ताज्या बातम्या