मराठी बातम्या /बातम्या /देश /हातात तिरंगा, मुखात भारत, शिख समुदायाचं खलिस्तानींना सडेतोड प्रत्युत्तर, ब्रिटीश हायकमिशनबाहेरचा Video

हातात तिरंगा, मुखात भारत, शिख समुदायाचं खलिस्तानींना सडेतोड प्रत्युत्तर, ब्रिटीश हायकमिशनबाहेरचा Video

ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर शिख समुदायाचं आंदोलन

ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर शिख समुदायाचं आंदोलन

नवी दिल्लीमधल्या ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाबाहेर शिख समुदायानं आंदोलन केलं आहे. सोमवारी चाणक्यपुरीमधल्या ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 20 मार्च : नवी दिल्लीमधल्या ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाबाहेर शिख समुदायानं आंदोलन केलं आहे. सोमवारी चाणक्यपुरीमधल्या ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. खलिस्तानींनी लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयातला तिरंगा हटवला होता, त्याविरोधात भारतातला शिख समुदाय आक्रमक झाला आहे.

दिल्लीतल्या ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर शिख समुदाय तिरंगा आणि फलक घेऊन पोहोचला होता. भारत हमारा स्वाभीमान है, अशा घोषणा शीख समुदायाकडून देण्यात आल्या. भारताचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही या आंदोलनादरम्यान शीख समुदायाने दिला आहे.

रविवारी लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानी घोषणाबाजी करण्यात आली, तसंच उच्चायुक्तालयातल्या कार्यालयातून भारतीय तिरंगा उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा हल्ला अपयशी ठरला असल्याचं उच्चायुक्तालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच यामध्ये दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले, पण त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे, असं लंडनमधल्या पोलिसांनी सांगितलं आहे.

लंडनमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर भारताने ब्रिटनच्या उपउच्चायुक्तांकडे सुरक्षेच्या अभावाबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेबाबत युके सरकार गंभीर नसल्याचं कठोर वक्तव्य भारतीय परराष्ट्र खात्याकडून करण्यात आलं आहे. तसंच उच्चायुक्तालयाच्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेतली चूक अस्वीकार्य असल्याचंही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनच्या उपउच्चायुक्तांना सांगितलं आहे.

लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयात झालेली ही घटना लज्जास्पद आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे. युके सरकार उच्चायुक्तालयाची सुरक्षा गांभिर्याने घेईल, असं स्पष्टीकरण ब्रिटन सरकारमधल्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

खलिस्तानी नेता असलेल्या अमृतपाल सिंगवर कारवाई झाल्यानंतर सिख्स फॉर जस्टिस ही बंदी घातलेली दहशतावदी संघटना पंजाबमध्ये सार्वमत घेत आहे. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी पाच जणांविरोधात एनएसए (नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट) लावला आहे. हे पाचही जण अमृतपाल सिंगच्या वारिस पंजाब दे या संघटनेशी संबंधित आहेत. अमृतपाल सिंग प्रकरणात परदेशातून पैसे आले असून यामागे आयएसआयचा हात असल्याचा संशय पंजाब पोलिसांना आहे.

वारिस पंजाब दे चा प्रमुख अमृतपाल सिंग अजूनही फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पंजाबच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शांतता समिती बैठका घेत असून परिस्थिती नियंत्रणात आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

First published:
top videos