नवी दिल्ली,10 डिसेंबर: आवडलेल्या मुलीशी लग्न करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणाऱ्या तरुणांच्या घटना नव्या नाहीत. एकतर्फी प्रेमातून (One side love) मुलीची हत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रासह देशभर घडल्या आहेत. मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव धुडकावल्याची मोठी किंमत तिच्या वडिलांना नुकतीच मोजावी लागली आहे. आरोपी तरुणाने त्यांच्या शरीरावर चाकूनं वार केले आणि डोक्यावर प्रेशर कुकरनं प्रहार केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीतल्या (Delhi) सोनिया विहार परिसरातला हा सर्व प्रकार आहे. या भागातील एका घरात बिजेंदर सिंह या 50 वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर सूरज या 25 वर्षांच्या तरुणानं त्यांची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. सूरज पालम मेट्रो स्टेशनमध्ये (Palam Metro Station) हाऊस किपर म्हणून काम करत होता. सूरज फरार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
काय आहे प्रकार?
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजेंदर सिंह आणि त्यांच्या पत्नीनं मोरादाबादमधील एका जोडप्याच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. या 24 वर्षांच्या दत्तक मुलीचे आरोपी सूरजशी प्रेमसंबंध होते. सिंह यांना हे प्रेम प्रकरण मान्य नव्हते. त्यांनी मुलीला बरंच समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.
नाराज मुलीनं सूरजपासून दूर होण्यास नकार दिला. त्यामुळे सिंह यांनी पत्नी आणि मुलीसह तिच्या खऱ्या आई – वडिलांकडं मोरादाबादमध्ये सोडलं.
सूरजने दिला होता लग्नाचा प्रस्ताव
सिंह यांनी मुलीला मोरादाबादला सोडण्यापूर्वी सूरजच्या आई-वडिलांनी त्यांच्यासमोर दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. सिंह यांनी तातडीनं हा प्रस्ताव फेटाळला. सूरजला ही गोष्ट पटली नाही. त्याने सिंह यांची हत्या करण्याचं ठरवलं. सिंह यांच्यावर पाळत ठेवून ते घरात एकटे असताना त्यांची हत्या केल्याची कबुली सुरज दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.