नवी दिल्ली, 8 जून : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची तब्येत काल रविवार पासून बिघडली असून त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. अरविंद केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केजरीवाल यांची कोरोनाची चाचणीही होणार आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रकृती बिघडल्यानंतर कालपासून त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी एक दिवस थांबण्यास सांगितलं असल्याने केजरीवाल यांची मंगळवारी सकाळी कोरोना चाचणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एकीकडे दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली असल्याने नवं आव्हान निर्माण झालं आहे.
दिल्लीत कोरोनाबाधितांमध्ये वाढ
दिल्लीतील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे प्रेस इन्फरमेशन ब्युरोचे महासंचालक आणि केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्त्यांनाही कोरोनाचा लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय माध्यम केंद्र आगामी 2 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि प्रशासनाला युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत.
देशात कोरोनाचा धोका कायम
गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन सात ते नऊ हजारांची भर पडत आहे. गेले सलग तीन दिवस 10 हजारांच्या नजीक रुग्णवाढ नोंदवण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 1 लाख 19 हजार 293 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात किंचित वाढ झाली असून ते 48.20 टक्क्यांवरून 48.36 टक्क्यांवर गेले आहे. देशात रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असली तरी, राष्ट्रीय स्तरावर समूह संसर्ग झाला नसल्याचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. देशात गेल्या 10 दिवसांत सुमारे 2 हजार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गेल्या 25 मे रोजी भारत करोनारुग्णांच्या बाबतीत जगातील अव्वल दहा देशांमध्ये पोहोचला आणि आता अवघ्या तेरा दिवसांत भारत जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सुदैवाने भारतात रुग्णांच्या आकड्याच्या तुलनेत मृत्यूदर खूप कमी आहे. जगातील अत्यल्प मृत्यूदर असलेल्या देशांमध्ये सध्या भारताचा समावेश होत आहे, हीच भारतासाठी जमेची बाब ठरली आहे. जगभरात करोनामुळे आत्तापर्यंत चार लाखांहून अधिक रुग्ण मृत्यमुखी पडले असताना भारतात मृतांची संख्या 7 हजाराच्या घरात पोहोचली आहे. ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी या लॉकडाउनचा अवलंब करणाऱ्या देशांच्या तुलनेत भारतात एक लाखामागे करोनारुग्णांची संख्या 17.23 इतकी, तर मृतांची संख्या एक लाखामागे 0.49 इतकी आहे.
Published by:Akshay Shitole
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.