'महाराष्ट्रात 1300 शाळा बंद केल्यात, जरा आमच्या शाळा पाहा' - प्रचारासाठी दिल्लीत गेलेले तावडे अडचणीत

'महाराष्ट्रात 1300 शाळा बंद केल्यात, जरा आमच्या शाळा पाहा' - प्रचारासाठी दिल्लीत गेलेले तावडे अडचणीत

दिल्लीकरांना एक आवाहन करत केजरीवाल यांनी विनोद तावडेंना खोचक टोला लगावला आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली, 29 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी भाजपानं जोर लावला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांसह केंद्रीय मंत्री आणि अनेक नेते दिल्लीत मुक्काम ठोकला आहे. महाराष्ट्रातूनही काही नेते पक्षाच्या प्रचारासाठी गेले असून भाजप नेते आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे सुद्धा उमेदवारांचा प्रचार करत आहेत.

विनोद तावडे यांचा प्रचार करतानाच फोटो ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. “महाराष्ट्रात 1300 सरकारी शाळा बंद करणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे दिल्लीत भाजपाचा प्रचार करणार आहेत. त्यांना दिल्लीतील शाळा दाखवा,”असं दिल्लीकरांना आवाहन करत केजरीवाल यांनी विनोद तावडेंना खोचक टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसही मैदानात

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर चौफेर टीका केली आहे. 'अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली ना आयुष्यमान भारत योजना लागू होऊ दिली ना प्रधानमंत्री आवास योजना...प्रत्येक गरिबाला घर मिळावं, त्याचे उपचार व्हावेत असं त्यांना वाटत नाही का?' असा सवाल करत फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपच्या बेताल नेत्यांना EC ची वेसण, अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मांची स्टार कॅम्पेनर यादीतून होणार हकालपट्टी

दिल्लीत विधानसभा निवडणुकीचं घमासान

गेल्या दोन दशकांपासून भारतीय जनता पक्ष दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र अद्याप त्यांना यश आलेलं नाही. 2020 ची निवडणूकही त्यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही. यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही आप पक्ष अधिक निश्चयी दिसत आहे. गेल्या पाच वर्षात आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कामाच्या जोरावर जनतेच्या मनात जागा निर्माण केली आहे. तर दुसरीकडे मुख्य विरोधी पक्ष भाजप हा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाच्या जोरावर निवडणूक लढत आहे. दिल्लीकरांच्या केंद्राच्या निर्णयावर विश्वास आहे. केवळ मोदी व शहा यांच्या नावावरुनच भाजपचा 21 वर्षांचा वनवास संपेल का? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

First published: January 29, 2020, 5:06 PM IST

ताज्या बातम्या