निकाल येण्याआधीच भाजपने स्वीकारला पराभव? जाणून घ्या VIRAL फोटोचं सत्य

निकाल येण्याआधीच भाजपने स्वीकारला पराभव? जाणून घ्या VIRAL फोटोचं सत्य

दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांचे कल समोर आले असून सध्याच्या स्थितीनुसार आप (AAP)56 तर भाजप (BJP) 14 जागांवर आघाडीवर आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी सुरू झाली असून सुरुवातीला आलेल्या कलांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीला आघाडी मिळताना दिसत आहे. दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांचे कल समोर आले असून सध्याच्या स्थितीनुसार आप (AAP)56 तर भाजप (BJP) 14 जागांवर आघाडीवर आहे.

एकीकडे मतमोजणी सुरू असताना दुसरीकडे भाजपने निकाल येण्याआधीच पराभव स्वीकारला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात लागवण्यात आलेला एक पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टरवर भाजपचे माजी अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसंच त्याच्यावर लिहिलं आहे की, 'विजयामुळे आम्ही अहंकारी होत नाही अन् पराभवामुळे निराश होत नाही.' अमित शहांचा फोटो असणारं हे पोस्टर आता व्हायरल होत असलं तरीही हे पोस्टर 2 वर्षांपूर्वीचं असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या भाजप कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांचेही असेच फोटो लावण्यात आले आहेत.

दरम्यान, या पोस्टरमुळे भाजपने पराभव मान्य केल्याची चर्चा असतानाच दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी मात्र भाजपला या निवडणुकीत बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. 'मी निराश नाही. भाजपसाठी आजचा दिवस चांगला ठरेल, असा मला आत्मविश्वास आहे. आम्ही सत्तेत येणार आहोत. भाजपला 55 जागा मिळाल्यास आश्चर्य वाटून देऊ नका,' अशी प्रतिक्रिया मतमोजणी सुरू होण्याआधी मनोज तिवारी यांनी दिली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू होतं. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची देशभरात उत्सुकता आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर आलेल्या काही संस्थांच्या एक्झिट पोल्सने दिल्लीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपचं सरकार स्थापन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

2015 साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने भाजप आणि काँग्रेसचा अक्षरश: धुव्वा उडवला होता. या निवडणुकीत 'आप'ला दिल्लीत 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपच्या खात्यात अवघ्या 3 जागा जमा झाल्या, तर कधीकाळी दिल्लीत निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता.

First published: February 11, 2020, 9:07 AM IST

ताज्या बातम्या