मुंबई हल्ल्यात जखमी झालेल्या या आमदार कमांडोला पवारांनी केलं 'आप'लंसं! आता NCP च्या तिकिटावर लढणार

मुंबई हल्ल्यात जखमी झालेल्या या आमदार कमांडोला पवारांनी केलं 'आप'लंसं! आता NCP च्या तिकिटावर लढणार

दिल्लीचे विद्यमान आमदार असलेले कमांडो सुरेंद्र सिंह यांना त्यांच्या आम आदमी पक्षाने (आप)तिकीट नाकारलं. आता या कमांडो सुरेंद्र यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. काय आहे या कमांडोचं मुंबई कनेक्शन?

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जानेवारी : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना एक वेगळी बातमी आली आहे. दिल्ली कँटोन्मेंटचे विद्यमान आमदार असलेले कमांडो सुरेंद्र सिंह यांना त्यांच्या आम आदमी पक्षाने (आप)तिकीट नाकारलं. आता या कमांडो सुरेंद्र यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. हे विद्यमान आमदार आता NCP च्या तिकिटावर दिल्लीची निवडणूक लढवणार आहेत.

कमांडो सुरेंद्र 'आप'च्या वतीने 2013 आणि 2015 च्या निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन्ही वेळेला ते दिल्ली कँटोन्मेंटमधून आमदार म्हणून निवडून आले. हरियाणाच्या झज्जरमध्ये मूळ गाव असलेले सुरेंद्र यांचा मुंबईशी संबंध आहे आणि त्याचमुळे कदाचित शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांना या वेळी उमेदवारी जाहीर केली आहे.

कोण आहेत कमांडो सुरेंद्र? मुंबईशी काय आहे नातं?

कमांडो सुरेंद्र NSG मध्ये कार्यरत होते. नॅशनल सिक्युरिटी गार्ड अर्थात NSG कमांडो म्हणून ते 2008 मध्ये मुंबईत तैनात होते. त्या वेळी अजमल कसाब आणि इतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईतवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांशी दोन हात करताना कमांडो सुरेंद्र जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी NSG मधून निवृत्ती घेतली. कमांडो सुरेंद्र यांना आपलं पेन्शन मिळवण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला होता. त्याच वेळी ते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या संपर्कात आले. केजरीवाल यांनी कमांडो सुरेंद्र यांना आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य करून घेतले. 2013 मध्ये त्यांना आपची उमेदवारीही मिळाली आणि ते जिंकून आले. 2015 च्या निवडणुकीतही सुरेंद्र यांना त्याच दिल्ली कँटमधून उमेदवारी मिळाली. ते पुन्हा आमदार झाले. या वेळी मात्र अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने 15 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं. त्यात कमांडो सुरेंद्र यांचाही समावेश होता. मंगळवारी सुरेंद्र सिंह यांनी 'आप'चा राजीनामा दिला आहे.

आपल्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं आहे. उद्या राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर पत्रकार परिषदेत याबाबत गौप्यस्फोट करणार, असं कमांडो सुरेंद्र यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आपले केजरीवाल यांच्याशी  वैयक्तिक, कौटुंबिक संबंध आहेत. ते संबंध वेगळे आणि राजकारण वेगळं, असंही सुरेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं.

आमदार सुरेंद्र यांची पदवी खोटी असल्याचे आरोप झाले होते. बनावट डिग्री सर्टिफिकेट सादर केलं म्हणून ते वादात सापले होते. पण RTI द्वारे माहिती पुढे आल्यानंतर त्यांच्या पदवीच्या वादावर वास्तविक पडदा पडला होता. पण तरीही या वेळच्या निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्याऐवजी दिल्ली कँटोन्मेंटमधून वीरेंद्रसिंह कादयान यांना 'आप'ने उमेदवारी दिली.

कमांडो सुरेंद्र यांचं मुंबई कनेक्शन लक्षात घेत राष्ट्रवादीने लगेचच त्यांना उमेदवारी जाहीर केली. NCP ने दिल्लीतून फार जणांना उमेदवारी दिलेली नाही. कमांडो सुरेंद्र यांना मात्र दिली आहे.

---------------------

अन्य बातम्या

आलिया भटच्या आईचं वादग्रस्त विधान, अफजल गुरुला म्हटलं ‘बळीचा बकरा’

कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार, मुंबई हादरली

तान्हाजी-भाजप व्हिडीओवर खा. संभाजीराजे भडकले, मोदी सरकारला दिला थेट इशारा

First published: January 21, 2020, 3:29 PM IST

ताज्या बातम्या